दापोली; पुढारी वृतसेवा दापोली तालुक्यातील आसूद येथे झालेल्या अपघातात मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. यामध्ये मिरा महेश बोरकर (वय २२ वर्षे) पाडले, वंदना चोगले (वय ३८ वर्षे) पाजपंढरी दापोली येथील भागवत हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान मृत्यू झाला, तर शरय्या शिरगावकर राहणार अडखळ यांचा डेरवण येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.
भीषण अपघातात सुरुवातीला पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर तीन जणांचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात हर्णै बाजारपेठ येथील प्रवासी मॅजिक चालक अनिल उर्फ बॉबी सारंग यांचाही जागीच मृत्यू झाला. या अपघातातील आणखी एक महिला अत्यवस्थ असल्याची माहिती मिळत असून, तिला मुंबई येथे हलवण्यात आलं आहे. या आठ जणांमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. दापोली तालुक्यात राज्यमार्गावर असलेल्या आसूद जोशी आळी येथे हा भीषण अपघात झाला. रविवारी दुपारी ३.३० सुमारास हा अपघात झाला.
ही धडक इतकी भीषण होती की, मॅजिक रिक्षा एका डोंगराच्या कपारीत अक्षरशः चेपली गेल्याने या अपघाताची भीषणता वाढली. या भीषण अपघाता प्रकरणी ट्रक चालक संशयित आरोपी फैज रहीस खान (मूळ राहणार यूपी ) याच्यावर दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ट्रक चालकाला अटकही केली आहे.
या भीषण अपघातात अडखळ येथील कदम व काझी या कुटुंबातील प्रत्येकी दोन जणांचा या प्रमाणे एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कदम कुटुंबातील वडील आणि लेकीचा तर काझी कुटुंबातील मायलेकींचा मृत्यू झाला. पाजपंढरी येथील चौगुले कुटुंबामधील पत्नीचा मृत्यू झाला आहे. सालदुरे येथे माल खाली करून दापोलीच्या दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने हर्णैकडे जाणाऱ्या मॅजिक प्रवासी रिक्षाला ही जोरात धडक दिली.
हेही वाचा :