Latest

बुलढाणा : शेगावात होणार राहुल गांधींची ‘भारत जोडो’ची जाहीर सभा

अनुराधा कोरवी

बुलढाणा; विजय देशमुख : देशातील वाढती महागाई, प्रचंड बेरोजगारी व विविध प्रश्नांवर काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबरपासून सुरू केलेली कन्याकुमारी ते काश्मीर 'भारत जोडो' यात्रा बुलढाणा जिल्ह्यातून १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान जाणार आहे. शेगाव येथे राहूल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेची राज्यातील दुसरी व शेवटची जाहीर सभा होणार आहे. तत्पूर्वी ७ नोव्हेंबरला तेलंगणा सीमेवरून नांदेड जिल्ह्यात ही यात्रा प्रवेश करेल.

७ ते २० नोव्हेंबर या १४ दिवसात नांदेड, हिंगोली, अकोला, वाशिम व बुलढाणा अशा ५ जिल्ह्यांतून यात्रेचा ३८२ कि.मी. प्रवास आहे. नांदेड व बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव या दोन ठिकाणीच जाहीर सभा होणार आहेत. देगलूर, शंकरनगर, नायगाव, नांदेड, अर्धापूर, आखाडा बाळापूर, कळमनूरी, हिंगोली, पानकनेरगाव, वाशिम, मालेगाव जहांगीर, पातूर, बाळापूर या मार्गाने १७ नोव्हेंबर रोजी 'भारत जोडो' यात्रा शेगावात पोहोचेल. राहुल गांधी यांची जाहिर सभा व मुक्कामानंतर भेंडवळ, जळगाव जामोद मार्गे पुढे मध्यप्रदेश राज्यातील तीनखुटीकडे ही यात्रा मार्गस्थ होईल. राहुल गांधी यांच्यासमवेत ३०० 'भारतयात्रीं'च्या ताफा असणार आहे.

तसेच यात्रा मार्गावर ठिकठिकाणी हजारो 'अतिथी यात्री' सहभागी होतील. या काळात राहुल गांधी यांचा प्रतिदिन मुक्काम यात्रेसमवेतच्या फिरत्या कंटेनरमध्ये असेल. यामध्ये एखाद्या रूम सारखी सर्व निवास व्यवस्था आहे. यात्रेमध्ये विश्रांतीसाठी एकूण ६० कंटेनर्स असून एका कंटेनरमध्ये १२ जण विश्रांती घेऊ शकतात. प्रत्येक कंटेनर हे ६० फूट लांबीचे असून राहुल गांधी मुक्काम करीत असलेल्या गावात या सर्व कंटेनरच्या पार्किंगसाठी किमान ४ ते ५ एकर मोकळे मैदान आवश्यक आहे.

कॉग्रेस नेते खा. राहूल गांधी यांना 'झेड प्लस' सुरक्षा कवच असल्याने या यात्रेदरम्यान त्यांच्या सुरक्षेचा सर्वाधिक ताण पोलीस यंत्रणेवर असणार आहे. राहुल गांधी यांची सुरक्षा त्यांच्यासमवेत पायी चालत-चालत करावी लागणार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी 'फिटनेस' च्या निकषांवर निवडले गेलेले पोलीस अधिकारी तैनात असतील. यात्रेदरम्यान सुरक्षा प्रबंधासाठी बाहेरच्या जिल्ह्यातून पोलीस अधिकारी व कर्मचा-यांचा मोठा फौजफाटा मागविला जाणार असून दीपावलीनंतर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून 'भारत जोडो' यात्रेच्या सुरक्षा नियोजनाच्या बैठका होणार आहेत. कॉग्रेस पक्षस्तरावरही या यात्रेबाबत पूर्वतयारी चालल्याचे दिसत आहे. त्या अनुषंगाने कॉग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांचे जिल्ह्यात संपर्क दौरे वाढले आहेत.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT