Latest

विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात सापडलेल्या खोटे दागिने प्रकरणाची चौकशी करा : हिंदु जनजागृती समितीची मागणी

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पोते भरून खोटे दागिने सापडल्याचे मंदिरातील अधिकार्‍यांनी जाहीर केले आहे. यामागे काही भाविक मुद्दामहून असे खोटे दागिने टाकत असल्याचे कारण देण्यात आले आहे. यातून एकप्रकारे मंदिर प्रशासनाने स्वत:चे हात झटकले आहेत. या प्रकरणी मंदिरातीलच कोणीतरी खरे दागिने लंपास करून त्याजागी खोटे दागिने ठेवून दागिन्यांचा अपहार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची शासनाने एका उच्चपदस्थ अधिकार्‍यांकडून सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली पाहिजे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

याबाबतचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने सोलापूर निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना दिले. पवार यांनी निवेदन पुढे पाठवले जाईल, असे आश्वासन हिंदु जनजागृती समितीचे राजन बुनगे यांना दिले. निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वीही मंदिर प्रशासनाच्या कारभारात दानपेटीत जमा होणारे पैसे रोजच्या रोज बँकेत जमा न करता दोन-दोन महिने पोत्यात भरून ठेवणे, हिशेबाच्या वह्या आणि पावती पुस्तके यांच्या वापराच्या नोंदी न ठेवणे, प्रतिवर्षी लाखो रुपयांचा खर्च गोधनाच्या खाद्यासाठी करणे, मात्र दुग्धोत्पादनातून मिळणारे उत्पन्न न दाखवणे, मंदिरातील गोधन कसायांना विकणे, ४८ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च लेखापरीक्षकांकडून तपासून न घेणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची इमारत भाडे करारावर घेणे; मात्र या इमारतीचा अपेक्षित असा वापर न झाल्याने २००० ते २०१० या कालावधीत मंदिराला ४७ लाख ९७ हजार ७१६ रुपयांचा तोटा होणे, आदी अनेक प्रकारचे घोटाळे हिंदु जनजागृती समितीने उघड केले आहेत. त्यामुळे पोते भरून खोटे दागिने सापडणे या प्रकरणातही काळेबेरे असू शकते.

जे वारकरी अन् वैष्णवजन शेकडो किमी पायी वारी करतात. ऊन, पाणी, थंडी आदींची पर्वा न करता आपल्या लाडक्या विठूरायाला भेटायला येतात. ते विठूरायाला खोटे दागिणे अर्पण का करतील? हा तर एकप्रकारे भोळ्या-भाबड्या वारकर्‍यांवर आरोप केल्यासारखेच आहे. या प्रकरणी नेमके काय षड्यंत्र आहे, याचा शोध घेतला गेला पाहिजे. यामध्ये भाविक सराफाकडून देवासाठी दागिने तयार करून घेतात. तेव्हा सराफाकडून खोटे दागिने दिले जात असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. याचाही सरकारने शोध घ्यायला हवा.

असे पुन्हा कोणाला करता येऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने दागिने अर्पण करताना ते खरे आहेत कि खोटे आहेत, हे लगेच पडताळण्याची व्यवस्था करायला हवी. अशी व्यवस्था अद्याप का निर्माण करण्यात आली नाही. यातून मंदिर प्रशासनाला देवनिधीची किती काळजी आहे हेच दर्शवते. मंदिर सरकारीकरणाचे हे दुष्परिणाम आहेत. मंदिर व्यवस्थापन भक्तांकडे असेल, तर भक्त देवनिधी कधी लुटणार नाहीत. यासाठी मंदिर सरकारीकरण रहित करावे, अशीही मागणी समितीने केली आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT