Latest

India-Maldives row | मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांना यायचे होते भारत भेटीवर, पण…

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : भारत आणि मालदीवमध्ये द्विपक्षीय संबंध ताणले गेले असतानाच मालदीवचे राष्‍ट्राध्‍यक्ष मोहम्‍मद मुइझ्झू यांच्या संभाव्य भारत दौऱ्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुइझ्झू यांनी सध्या चीन दौऱ्याची निवड केल्याने भारताने त्याच्या दौऱ्याबाबत सहमती दर्शवलेली नाही. (India-Maldives row)

सध्या मुइझ्झू हे आठवडाभराच्या चीनच्या दौऱ्यावर आहेत आणि त्याआधी त्यांनी भारताचा दौरा करण्याऐवजी तुर्कस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीला भेट दिली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मालदीवने राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांच्या दिल्ली भेटीचा प्रस्ताव दिला होता. पण दोन्ही बाजूंनी तारखांवर एकमत होऊ शकले नाही.

संबंधित बातम्या 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालदीवचे राष्ट्राध्यक्ष जानेवारीच्या अखेरीस अथवा फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर येऊ शकतात. विशेष म्हणजे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांना पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच भारत दौऱ्यावर यायचे होते. पण त्यांच्या दौऱ्याच्या तारखांवर एकमत झाले नाही. त्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्या दौऱ्यासाठी तुर्कस्तान निवड केली.

नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू हवामान बदलावरील COP-28 शिखर परिषदेत सहभागी झाले होते. मुइझ्झू सध्या भारताचा शेजारी देश चीनच्या दौऱ्यावर आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप भेटीची छायाचित्रे समोर आली. मालदीव सरकारमधील काही उपमंत्र्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यावर भारत सरकारनेही तीव्र नाराजी व्यक्त केली. मालदीवमधील भारताच्या उच्चायुक्तांनी याबाबत मालदीव सरकारकडे तक्रार केली. तसेच सोमवारी, भारतातील मालदीवच्या राजदूताला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने समन्स बजावले.

मालदीव सरकारने भारतीय उच्चायुक्त मुनू मुहावर यांना सांगितले की, पीएम मोदींविरोधात केलेल्या टिप्पण्यांचा त्यांच्या सरकारशी काहीही संबंध नाही. मालदीवच्या माध्यमांनी म्हटले आहे की, भारतीय उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले होते. पण भारतीय उच्चायुक्तांनी ती पूर्वनियोजित बैठक असल्याचे सांगितले. उच्चायुक्त मुनू महावर यांनी आज मालदीवच्या एमओएफएमध्ये राजदूत डॉ. अली नसीर मोहम्मद यांच्यासोबत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पूर्व-नियोजित भेट घेतली, असे सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. मोहम्मद मुइझ्झू यांचा पक्ष गेल्या वर्षी इंडिया आऊट निवडणूक प्रचारामुळे सत्तेवर आला होता. मालदीवच्या मंत्र्यांनी पीएम मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीनंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. (India-Maldives row)

चीन दौऱ्यादरम्यान बीजिंगमध्ये मुइझ्झू यांनी मंगळवारी चीनला आवाहन केले की मालदीवमध्ये अधिक पर्यटक पाठवावेत. काही भारतीय सेलिब्रिटींनी आणि इतरांनी मालदीववर बहिष्कार टाकला आहे. यामुळे मालदीव पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, "कोविडपूर्वी चीन ही आमची नंबर १ बाजारपेठ होती आणि चीनला हे स्थान परत मिळावे यासाठी प्रयत्न करावेत, अशी माझी विनंती आहे. त्यांचा सध्याचा दौरा १२ जानेवारीपर्यंत असेल. भारतासाठी त्यांचा दौरा योग्य वातावरणात होणे महत्त्वाचे आहे.

गेल्या आठवड्यात टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, गेल्या वर्षी मालदीवमध्ये भारतीय पर्यटक सर्वाधिक आले होते.

हे ही वाचा ;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT