भांडुप ; पुढारी वृत्तसेवा : मुंबई महानगरपालिकेच्या प्रसूतीगृहांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रात्री डॉक्टर उपलब्ध नसल्याने आठ महिन्याच्या गरोदर महिलेला आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. मुलुंड च्या पाच रस्ता परिसरात असलेल्या पालिका प्रसूतिगृहमधील ही धक्कादायक घटना आहे.
मुलुंड च्या डंपिंग रोड परिसरात रहाणाऱ्या आठ महिन्याच्या गरोदर निशा कसबे यांना या पालिकेच्या रुग्णालयात सोमवार (दि. २७) रोजी दुपारी दाखल करण्यात आले होते. मात्र मध्यरात्री त्यांची तब्येत बिघडली.
यावेळी रुग्णालयात एकही डॉक्टर उपलब्ध नव्हते. अखेर दोन वाजता येथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकाना याची माहिती दिली.
त्या नंतर त्या महिलेला पालिकेच्या सावरकर रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. प्रसूतीगृहामध्ये डॉक्टर नसल्याने उपचार होऊ शकले नाही. आणि यामुळे निशा आणि तिच्या मुलाचा दुर्दवी मृत्यू झाला आहे.
याला पूर्णपणे पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे नातेवाईकांचा आरोप आहे. तर दोषींवर कडक कारवाईची मागणी नातेवाईक करीत आहेत.
याबाबत स्थानीक आमदार मिहीर कोटेचा यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असता, रुग्णालय मधील डॉक्टरांनी इथे फक्त सकाळी ९ संध्याकाळी ४ वाजेपर्यंत डॉक्टर उपलब्ध असल्याची कबुली दिली आहे.या मुळे आमदार कोटेचा यांनी देखील संताप व्यक्त केला असून या बाबत तक्रार करणार असल्याचे सांगितले.