कोल्हापूर ; चंद्रशेखर माताडे : यंत्रमाग उद्योगाच्या वीज सवलतीबाबत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांना कोल्हापूर दौर्यावर जाण्याची सूचना दिली. त्यानुसार हा दौराही ठरला. शनिवारी (दि. 29 जानेवारी) शेख कोल्हापूर दौर्यावर येणार होते. पण हा दौरा अचानकपणे रद्द झाला. दि. 28 रोजी या प्रश्नाबाबत ऑनलाईन बैठक झाली. या सर्व कार्यक्रमातून प्रकाश आवाडे यांना दूर ठेवण्यात आले. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या दबावानंतर घडलेल्या या मानापमान नाट्याची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (Prakash Awade)
27 अश्वशक्तीवरील यंत्रमागधारकांना वीज सवलतीसाठी असलेली ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करावी व यंत्रमागासाठी देण्यात आलेल्या 75 पैशांच्या अतिरिक्त सवलतीची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी यंत्रमागधारकांची मागणी आहे.
या मागणीसाठी राजेश पाटील, बाळासाहेब कलागते, सतिश कोष्टी, सुनील पाटील, चंद्रकांत पाटील, महेश सातपुते, राजगोंडा पाटील, विनय महाजन आदींचे शिष्टमंडळ मुंबईत एच. के. पाटील यांना भेटले. यापूर्वीही एका शिष्टमंडळाने कर्नाटकात जाऊन पाटील यांची भेट घेतली होती.
गुरुवारी मुंबईत हे शिष्टमंडळ भेटले तेव्हा पाटील यांनी तातडीने अस्लम शेख यांच्याशी संपर्क साधला. शेख यांना इचलकरंजीला भेट देऊन तेथील प्रश्नांची माहिती घेऊन त्याची निर्गत करावी, अशा सूचना दिल्या.
त्यानुसार शेख हे शनिवार दि. 29 रोजी कोल्हापूर दौर्यावर येणार होते. याची कुणकुण लागताच महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी याबाबत पक्षातील वरिष्ठांशी संपर्क साधला व प्रकाश आवाडे (Prakash Awade) हे भाजपचे सहयोगी सदस्य असल्याने त्यांच्या पुढाकाराने हा दौरा होऊ नये, प्रश्न महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुटला पाहिजे, असे साकडे घातले. त्यानंतर तातडीने हालचाली झाल्या आणि हा दौराच रद्द झाला.
त्यानंतर याबाबत ऑनलाईन बैठक घेण्याचे ठरले तेव्हा त्याचे निमंत्रण निघाले. पण त्यातून प्रकाश आवाडे यांना वगळण्यात आले. वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांचे खासगी सचिव भागवत मुरकुटे यांच्या सहीने निघालेल्या या पत्रानुसार दि. 28 रोजी झालेल्या या ऑनलाईन बैठकीसाठी पालकमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, आ. प्रणिती शिंदे. प्रधान सचिव वस्त्रोद्योग, आयुक्त वस्त्रोद्योग व इतर संबंधित अधिकार्यांनाच केवळ निमंत्रित करण्यात आले. प्रकाश आवाडे यांना बैठकीतून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.