Latest

पुणे महापालिका : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खेळीने भाजपपुढे आव्हान!

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या प्रभागरचनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीने प्रभागरचनेच्या माध्यमातून खेळलेल्या राजकीय खेळीमुळे आता सत्ताधारी भाजपपुढे कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महापालिकेतील सत्तेची समीकरणे प्रभागरचनेवर ठरतात. 2017 च्या पालिका निवडणुकीत भाजपसाठी प्रभागरचना अनुकूल झाल्याने भाजपची थेट एकहाती सत्ता आली होती. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने जाहीर झालेली प्रभागरचना राष्ट्रवादीसाठी अधिक फायदेशीर ठरेल, असे प्राथमिक चित्र आहे.

महापालिकेच्या 173 पैकी तब्बल 103 नगरसेवकांची संख्या राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या वडगाव शेरी, हडपसर आणि खडकवासला या मतदारसंघांत एकवटली आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिणामी कसबा, शिवाजीनगर हे भाजपचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघातील नगरसेवकांची संख्या मात्र घटली आहे, त्याचा फटका भाजपला बसू शकतो. याशिवाय प्रभागरचनेतील बदललेल्या गणितांमुळे भाजपमधील काही विद्यमानांना राष्ट्रवादीने थेट पक्षातून बाहेर पडण्याशिवाय पर्याय ठेवला नसल्याचे चित्र आहे.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार असले, तरी पुण्यातील प्रभागरचनेत मित्रपक्ष शिवसेना आणि काँग्रेसला मात्र फारसा वाव मिळाला नसल्याचे दिसते. त्यामुळे सत्ता असून, पुण्यात या दोन्ही पक्षांना पक्षवाढीसाठी फार मोठी संधी मिळाली नसल्याचे चित्र आहे, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आता पालिका निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत असलेल्या आम आदमी पक्ष या दोन्ह पक्षांना नव्या प्रभागरचनेनुसार मोठे आव्हान असेल, असे चित्र आहे.

58 प्रभागांत 173 नगरसेवक

पुणे महापालिकेच्या मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या नव्या प्रभागरचनेत एकूण 58 प्रभाग असून, त्यातील 57 तीनसदस्यीय तर एक दोनसदस्यीय आहे. सर्वांत मोठा प्रभाग महात्मा सोसायटी-बावधन हा असून, त्या भागाचे प्रतिनिधित्व सध्या महापौर मुरलीधर मोहोळ हे करतात. नव्या प्रभागरचनेमुळे नगरसेवकांची सध्याची 164 ही संख्या 173 पर्यंत गेली आहे. नवी प्रभागरचना आपल्याच पक्षाला अनुकूल असल्याचा दावा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष तसेच विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसनेही केला आहे. नवी प्रभागरचना राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी संगनमताने केली असून, प्रभागरचनेचा खून केला असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला, तसेच महापालिकेसमोर
आंदोलनही केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT