Latest

COVID-19 : कोरोनाचा नवा व्हेरियंट; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक

दीपक दि. भांदिगरे

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

COVID-19 situation and vaccination : दक्षिण आफ्रिकेत 'ओमिक्रॉन' (Omicron) या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका वाढलाय. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) शुक्रवारी तातडीची बैठक बोलावून अवघ्या जगाने सतर्कता बाळगावी, असा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर देशातील कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरणाबाबत आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी सकाळी उच्चस्तरीय सरकारी अधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीला कॅबिनेट सचिव राजीव गौबा, पंतप्रधानांचे प्रधान सचिव पीके मिश्रा, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल उपस्थित आहेत.

नव्या व्हेरियंटचा धोका लक्षात घेऊन ब्रिटननं दक्षिण आफ्रिका, नामीबिया, बोत्सवाना, झिम्बाब्वे, लिसोथो आणि एसवाटिनी या आफ्रिकेतील सहा देशांतून येणारी विमाने परतविली आहेत. दक्षिण आफ्रिकेतून हाँगकाँगला आलेल्या दोघांना या व्हेरियंटची लागण झाल्याचे आढळून आले आहे. जर्मनीने या व्हेरियंटचा धोका लक्षात घेता चाचण्या वाढविल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत येण्या-जाण्यावर बंदी घातली आहे.

कोरोनाचा हा नवा व्हेरियंट डेल्टापेक्षाही जास्त धोकादायक असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी तातडीने बोलावलेल्या बैठकीत उपाययोजनांवर चर्चा झाल्याचे समजते. हाँगकाँगपर्यंत या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येऊ लागलेले असल्याने भारतासाठीही हा व्हेरियंट धोक्याची बाब ठरणे शक्य आहे. दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत या व्हेरियंटचे 22 रुग्ण आढळून आले आहेत, असे या देशातील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शिअस डिसिज'कडून सांगण्यात आले. शास्त्रज्ञांनी या स्ट्रेनचे नामकरण 'बी. 1.1.529' असे केले आहे.

कोरोनाचा नवा व्हेरियंट, केजरीवाल यांनी व्यक्त केली चिंता…

कोरोनाच्या (COVID-19) नव्या व्हेरियंटच्या धोक्याविषयी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना विनंती केली आहे की ज्या देशात नव्या व्हेरियंटचा प्रादुर्भाव आहे तेथून येणारी विमान वाहतूक थांबवावी. आपला देश कोरोनातून सावरला आहे. यामुळे नव्या व्हेरियंट भारतात येऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय हाती घेतले पाहिजेत. असे केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : सरकारने आमच्या आयुष्याची कॉमेडी केली – महिला एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT