पिंपरी : संतोष शिंदे : मालक..! गावाकडं शेतात नांगर हाकताना भावाला सोन्याचा हंडा सापडलाय, मला यातलं काहीच कळत नाय, तुम्ही फक्त पाच लाख घेऊन चला अन् सगळंच सोनं घेऊन या, अशी बतावणी करून नोकराच्या वेशात राहत असलेला चोरटा गुंठामंत्री असलेल्या मालकाला भुरळ पाडून गावी घेऊन जातो.
तेथे गेल्यानंतर मालकाला शेतात नेण्याच्या बहाण्याने निर्जन ठिकाणी नेले जाते. त्यानंतर दबा धरून चोरटे गुंठामंत्र्याची यथेच्छ धुलाई करतात. शेवटी सोन्याच्या मोहापायी शेकडो मैल गेलेला गुंठामंत्री जिवाच्या भीतीने तेथून पळ काढून थेट घर गाठतो.
घरी आल्यानंतरही गावात आपल्याच अब्रूचे धिंडवडे निघतील, या भीतीने तो झाल्या प्रकाराबाबत 'ब्र' शब्द काढत नाही. त्यामुळे अलीकडे असे प्रकार वाढू लागले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहराच्या सभोवताली असलेल्या स्थानिकांच्या जमिनींना अलीकडच्या पाच-दहा वर्षांत सोन्याचा भाव आला. त्यामुळे बैलगाडीतून फिरणारा शेतकरी अचानक गुंठामंत्री म्हणून ओळखला जाऊ लागला.
दोन वेळची भाकरी घेऊन शेतात काम करणारा स्थानिक तरुण हाताखाली नोकरांची फौज ठेवून शेतीसह जोडधंद्याची कामे पाहू लागला. याचा फायदा घेऊन देशातल्या कानाकोपर्यातून आलेली मजूर कुटुंब या स्थानिक गुंठामंत्र्याच्या हाताखाली राबत असल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळते.
अलीकडे अनेक ठिकाणी मालक आणि नोकर यांच्यात चांगली गट्टी जमल्याचेही दिसून येते. याचाच फायदा घेत काही सराईत गुन्हेगारांनी नोकराच्या वेशात राहून स्थानिकांना आपल्या मूळगावी नेऊन लुटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्थानिकांनी नोकर ठेवताना विशेष
खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिस यंत्रणांकडून केले जात आहे.
'त्या' गुंठामंत्र्याच्या लूटमारीची चर्चा : वाकड परिसरातील एका गुंठामंत्र्याची देखील त्याच्या नोकराने अशाच प्रकारे लूटमार केली आहे. संबंधित गुंठामंत्र्याला सोन्याच्या आमिषाने गावी नेऊन त्याच्याकडील लाखो रुपयांची रोकड काढून घेतली.
या घटनेला काही महिने उलटून गेले. मात्र, पोलिसांचा ससेमिरा आपल्याच मागे लागेल, या भीतीने गुंठामंत्री अजूनही मौन बाळगून आहे. असे असले तरीही या घटनेची वाकड परिसरात चांगलीच चर्चा आहे.
गावाला सोने सापडल्याचे मालकाला सांगितल्यानंतर नोकर आधी एकटाच गावी जाऊन येतो. गावावरून परतल्यानंतर सोन्याचा एक तुकडा मालकाच्या हातात ठेवून अशा प्रकारचे सोने मिळाल्याचे नोकर सांगतो.
तसेच, जाणीवपूर्वक मालकाला त्या सोन्याच्या शुद्धतेची खात्री करून घेण्यास भाग पाडतो. सोनार देखील तो तुकडा खराखुरा असून, सोन्याचा दर्जादेखील अव्वल असल्याचे प्रमाणित करतो. त्यामुळे मालकाची नियत फिरते व तो रोकड घेऊन गावी जाण्यास तयार होतो.
मेहुण्याला खोदकाम करताना एक किलो सोने सापडल्याचे सांगून गजानन लिंगू पवार (रा. मरडसगाव, ता. गंगाखेड, परभणी)
या कामगाराने शुभम गोपीचंद ढमढेरे यांना सात लाखांचा गंडा घातला. ही घटना 17 मार्च रोजी रात्री साडेसातच्या सुमारास हिंजवडी नजीकच्या जांबे येथे उघडकीस आली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खोदकाम करताना सोने सापडल्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये नोकरच आरोपी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्थानिकांनी नोकर ठेवताना सर्वप्रथम त्याची इथंभूत माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच, नोकराच्या कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. नोकरांसमोर आर्थिक व्यवहार किंवा कॅश हाताळू नये. अशा प्रकारची कोणी बतावणी करीत असल्यास स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती द्यावी.
– डॉ. संजय शिंदे,
अपर पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड