YCM Hospital Pudhari
पिंपरी चिंचवड

YCM Hospital Medicine Shortage: वायसीएम रुग्णालयातील औषध टंचाई अखेर दूर

चार दिवसांपासून औषधांचा तुटवडा; तातडीने खरेदी करून पुरवठा सुरळीत

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) गेल्या चार दिवसांपासून असलेला औषधांचा तुटवडा अखेर दूर झाला आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने औषध खरेदी प्रक्रिया राबवून पुरवठा सुरळीत केल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

महापालिका प्रशासनाकडून आवश्यक निविदा (टेंडर) प्रक्रिया पूर्ण होऊनही औषधांची प्रत्यक्ष खरेदी करण्यात येत नसल्याने हा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी, उपचारासाठी येणाऱ्या गरीब आणि गरजू रुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेली गोळ्या-औषधे खाजगी मेडिकलमधून महागड्या दराने विकत घ्यावी लागली.

वायसीएम रुग्णालय हे पिंपरी-चिंचवड शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हक्काचे रुग्णालय मानले जाते. दररोज हजारो रुग्ण या ठिकाणी बाह्यरुग्ण (ओपीडी) आणि आंतररुग्ण विभागात उपचारासाठी येत असतात. नियमानुसार, रुग्णांना पालिकेमार्फत मोफत किंवा सवलतीच्या दरात औषधे मिळणे अपेक्षित आहे. या औषध पुरवठ्यासाठी महापालिकेने रीतसर टेंडरप्रक्रियादेखील राबवली आहे. मात्र, प्रशासकीय पातळीवरील दिरंगाई आणि उदासीनतेमुळे टेंडर मंजूर होऊनही औषधांचा साठा रुग्णालयाला प्राप्त झालेला नाही. तांत्रिक अडचणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संथ कारभारामुळे ही खरेदीप्रक्रिया रखडल्याची चर्चा आहे.

रुग्णालयातील औषध भांडारात सध्या अनेक जीवनरक्षक औषधे, अँटिबायोटिक्स, वेदनाशामक गोळ्या आणि अगदी प्राथमिक उपचारासाठी लागणारे साहित्यही उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर रुग्णांच्या हातात थेट खासगी मेडिकलमधून आणण्याच्या चिठ्ठ्या (प्रिस्क्रिप्शन) दिल्या. वायसीएम रुग्णालयात येणारा बहुतांश वर्ग हा कामगार, कष्टकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहे. खासगी रुग्णालयाचा खर्च परवडत नाही, म्हणून नागरिक येथे येतात, मात्र येथे आल्यावरही औषधांसाठी हजारो रुपये खर्च करावे लागल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

वायसीएम रुग्णालयात मागील दोन-चार दिवसांत गोळ्या-औषधाची टंचाई निर्माण झाली होती. एका ठेकेदार कंपनीचे काम काढून घेतल्यामुळे पुरवठा वेळेत झाला नाही; मात्र आता सर्व औषधे तातडीने खरेदी करण्यात आली असून, औषधाची टंचाई दूर झाली असून पुरवठा सुरळीत आहे.
डॉ. लक्ष्मण गोफणे आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT