पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर, पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव अविनाश म्हस्के हे दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत आढळून आले आहेत. त्याप्रकरणी त्याचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे. त्या डॉक्टरची विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागास दिले आहेत.
डॉ. म्हस्के हे महापालिकेच्या आस्थापनेवरील ब संवर्गातील वैद्यकीय अधिकारी आहेत. वैद्यकीय सेवा ही रुग्णांच्या आरोग्याशी व जीवनाशी थेट संबंधित असल्याने या सेवेतील अधिकारी व कर्मचार्यांनी आपली कर्तव्ये जबाबदारीने, सचोटीने आणि समर्पित भावनेने पार पाडणे अपेक्षित आहे. मात्र, डॉ. म्हस्के हे गुरुवारी (दि. 15) रात्री कामावर असताना दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत आढळून आले.
मृत्यू दाखल्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतर एक नातेवाईक आत गेला. तेव्हा ते डॉक्टर मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आला. त्यांनी तो व्हिडीओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या प्रकारावरून वायसीएम रुग्णालयास मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. ती बाब रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या निदर्शनास आणून दिली.
त्या प्रकरणाची तातडीने दखल घेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी डॉ. म्हस्के यांच्यावर कारवाई करत, त्यांचे तत्काळ निलंबन केले आहे. कामावर असताना दारूच्या प्रभावाखाली राहणे आणि त्यामुळे कर्तव्यपालनावर परिणाम होणे हे शासकीय सेवकांसाठी निर्धारित आचारसंहितेच्या विरोधात आहे.
15 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देश
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील नियम 3 आणि नियम 28 तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 56 (1) यांचा भंग झाला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील नियम 4 आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 56 (2) मधील तरतुदींनुसार डॉ. म्हस्के यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील नियम 8 नुसार त्यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे. चौकशीसाठी 15 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचे निर्देशही आदेशात देण्यात आले आहेत.