

वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील आंद्रा धरणग्रस्तांच्या गेल्या २६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (दि. २२) तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. आंद्रा धरणातून तळेगाव, पिंपरी-चिंचवडसह वडगाव मावळला पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनाला तसेच ठोकळवाडी धरणातूनही पाणी नेण्याच्या प्रस्तावित हालचालींना धरणग्रस्तांनी विरोध दर्शविला आहे. सुरू असलेले बंदिस्त पाइपलाइनचे काम तातडीने थांबवावे, अशी ठाम मागणी धरणग्रस्तांनी केली आहे.
टाकवे बुद्रुक येथील भैरवनाथ मंदिरात आंद्रा धरणग्रस्त व परिसरातील शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत गेल्या २६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शासनाकडून धरणग्रस्तांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. बाधित शेतकरी आणि कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस आंदर मावळ परिसरातील शेतकरी आणि धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील धरणग्रस्तांमध्ये एकजूट निर्माण करण्यावर भर देण्यात आला असून या बैठकीत २२ तारखेला होणाऱ्या मोर्चात आंदर मावळातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांनी उपस्थितीत राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाइपलाइनचे काम न थांबवल्यास शेतकरी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाणार
बंदिस्त पाइपलाइनचे काम तातडीने थांबवले नाही, तर शेतकरी आणि धरणग्रस्त स्वतः कामाच्या ठिकाणी जाऊन ते थांबवतील, असा इशारा बैठकीत देण्यात आला. या प्रश्नावरून परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन शासन आणि प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करावा, अशी मागणीही करण्यात आली.
प्रलंबित मागण्यांवर प्रथम निर्णय घ्या
धरणग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांवर निर्णय झाल्याशिवाय पाणी बाहेर नेण्याच्या योजनांना सहकार्य करणार नसल्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली. बंदिस्त पाइपलाइनद्वारे सुरू असलेले काम तातडीने थांबवावे आणि शासनाने धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कार्यवाही करावी आणि धरणग्रस्तांच्या मागण्यांची सोडवणूक करावी, अशी भूमिका उपस्थितांनी मांडली.
आंद्रा, ठोकळवाडीच्या पाण्याच्या नियोजनालाही विरोध
आंद्रा धरणातून तळेगाव आणि पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करण्याबरोबरच वडगाव मावळलाही पाणी नेण्याचे नियोजन असल्याचे धरणग्रस्तांचे म्हणणे आहे. तसेच ठोकळवाडी धरणातील पाणीही बाहेर नेण्याच्या नियोजनाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. स्थानिक भागातील शेतकरी आणि धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित असताना बाहेरील शहरांसाठी पाणी नेण्याच्या योजनांना प्राधान्य का दिले जात आहे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.