तळेगाव दाभाडे: सध्या हवामानामध्ये आमूलाग्र बदल होत आहे. थंडी, उष्णता व ढगाळ वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यामध्ये सर्दी, कणकण, खोकला, ताप, घशातील खवखव यासारख्या आजारांना हे वातावरण खतपाणी घालत असल्याने शहरी व ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढली आहे. यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे, आवाहन वैद्यकीय विभागातील तज्ज्ञांकडून केले जात आहे.
बदलत्या हवामानामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढल्या आहेत. सर्व दवाखान्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्याच्या वातावरणामुळे लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, श्वसन विकार, पोटाचे विकार, त्वचेचे विकार होऊ शकतात. लहान मुलांची प्रकृती कफ प्रधान असल्याने, कफातील जास्त विकार दिसून येतात. या वातावरणात विषाणूंमुळे होणारे विकार जसे की फ्लू, कांजण्या यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसून येत आहे.
वातावरणातील या बदलामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच दम्याचे आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. या वातावरणात अनेक साथीचे आजार, तसेच व्हायरल इन्फेक्शन बळावत असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या स्वास्थ्याविषयी तक्रारी वाढलेल्या पाहायला मिळते.
बदलत्या वातावरणाचा परिणाम लहान मुलांवर लगेच होतो. त्यामुळे पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. लहान मुलांनी किमान नऊ तासांची झोप घ्यावी. आहारामध्ये प्रथिने, कर्बोदके, फायबर आणि जीवनसत्वे यांचा वापर करावा. हलका व्यायाम व वेळेनुसार लसीकरण करून घ्यावे, लहान मुलांना दम लागत असेल तर तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.डॉ. महेंद्र चव्हाण, बालरोगतज्ज्ञ.
या वातावरणात व्हायरल इन्फेक्शन व साथीचे आजार बळावतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच दमा असलेल्या रुग्णांनी सोशल ग्यादरिंग टाळावे. योग्य आहार, नियमित व्यायाम याकडे लक्ष द्यावे. पाणी उकळून प्यावे. बाहेर जाताना शक्यतो मास्कचा वापर करावा. हस्तांदोलन टाळावे. हात नियमित स्वच्छ धुवावेत.डॉ. रोहित मिनियार