वडगाव मावळ: मुंबई-पुणे महामार्गावर सुरू असलेल्या डागडुजीमुळे आज वडगाव - तळेगाव भागात सुमारे तीन ते चार तास वाहतूक ठप्प झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी निर्माण झाली. अखेर वडगाव मावळ पोलिसांनी चौकाचौकांत बंदोबस्त लावून वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे आयआरबी कंपनीचे काम, पोलिसांना ताप अन् प्रवाशांना त्रास अशी स्थिती आज निर्माण झाली.
आज सकाळी मुंबई-पुणे महामार्गावर वडगाव ते तळेगाव फाटा येथे आयआरबी कंपनीच्या वतीने रस्त्याचे काम सुरू होते. त्यामुळे काही वेळ वाहतूक रोखून धरण्यात आली होती. ऐन रहदारीच्या वेळी वाहतूक रोखून धरल्याने महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे पश्चिमेकडे जांभूळ फाट्यापर्यंत तर पूर्वेकडे सोमाटणे फाट्यापर्यंत वाहतूककोंडी झाली. तसेच एमआयडीसी रस्त्यावर आणि तळेगाव चाकण रस्त्यावरही वाहतूक ठप्प झाली.
स्थानिक वाहनचालकांनी वडगावहून तळेगावला जाण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर केल्याने वडगाव शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्ता, वडगाव - तळेगाव साखळी रस्ता हे रस्तेही जाम झाले. त्यामुळे जवळपास तीन ते चार तास विशेषतः वडगाव शहराच्या सर्वच बाजूंनी ट्रॅफिकचा विळखा पडला होता. अखेर, वडगाव मावळ पोलिसांनी चौकाचौकांत बंदोबस्त लावून वाहतूक सुरळीत केली.
सीआरपीएफ समोर उलटला ट्रॅक्टर
गुरुवारी सीआरपीएफ समोर उसाचा ट्रॅक्टर पलटी झाल्याने सुमारे दोन तास महामार्गावर वाहतूककोंडी झाली. यामुळे मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लेणमध्ये चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. यामुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना काही तास ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागले. यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवाशांना निश्चित स्थळी पोहोचण्यास उशीर झाला.
वडगाव पोलिस ठाण्याचा संपूर्ण स्टाफ उतरला रस्त्यावर!
वडगाव शहराच्या सर्व बाजूंनी वाहतूक ठप्प झाल्याने ऐन वाहतुकीच्या वेळी मोठा खोळंबा झाला. शहरातील रस्तेही जाम झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यामुळे पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव मावळ पोलिस ठाण्याचे सर्व पोलिस कर्मचारी चौकाचौकांत नेमण्यात आले, त्यांनी काही वेळातच वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.