

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील इंदिरा गांधी उद्यान- दुर्गादेवी टेकडीच्या पायथ्यावर शनिवार (दि. 10) मतदान जनजागृती करण्यात आली. यानिमित्त आयोजित वॉकेथॉन फॉर मतदानात अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला.
महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. 15) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 मतदान होणार आहे. त्यादिवशी मतदारांनी आवर्जून मतदान करावे म्हणून महापालिकेकडून शहरभरात जनजागृती केली जात आहे. या कार्यक्रमास महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, युवक, नागरिक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्या ठिकाणी फ्लॅश मॉब व पथनाट्य सादर करण्यात आले.
अभिनेत्री श्रेया बुगडे म्हणाल्या की, मतदान हा आपला हक्कच नाही, तर कर्तव्यदेखील आहे. आपल्या पुढील पिढीसाठी 15 जानेवारीला नक्की मतदान करा. युवकांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदान करून इतरांनादेखील यासाठी प्रोत्साहित करावे. मतदानाचा दिवस हा सुटीचा दिवस न समजता मतदान करण्यासाठी प्रत्येक पात्र मतदाराने मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे. अभिनेत्री बुगडे यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.