Vithaldham Germany Saint Idols Pudhari
पिंपरी चिंचवड

Vithaldham Germany Saint Idols: जर्मनीतील विठ्ठलधाममध्ये संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना

अक्षय तृतीयेला भव्य प्राणप्रतिष्ठा; भागवत धर्माच्या जागतिक प्रचाराला चालना

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव: जर्मनीतील ख्रिसचेम येथे असलेल्या श्री विठ्ठलधाम या ठिकाणी असलेल्या भगवान विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, आळंदी देवस्थान संस्थानच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती जर्मनीकडे रवाना करण्यात आली आहे.

येत्या 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा जर्मनीतील विठ्ठलधाम मंदिरात संपन्न होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंतीवर्षानिमित्त तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 450 व्या वैकुंठगमन वर्षानिमित्त, संतांच्या विचारांचा, साहित्याचा व

भागवत धर्माचा जागतिक स्तरावर प्रचार-प्रसार व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी आळंदी व देहू देवस्थान संस्थानच्या वतीने विठ्ठलधाम, जर्मनी येथील मठाधीपतींकडे मूर्ती प्रतिष्ठापनेची विनंती करण्यात आली होती. ती विनंती मान्य झाल्यानंतर दोन्ही देवस्थान संस्थानांनी मूर्ती भेट स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला.

आळंदी देवस्थान संस्थान कमिटीच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराजांची दोन फूट उंचीची मूर्ती मकराना पांढऱ्या संगमरवरी दगडात, जैन श्वेतांबर मूर्तिकला केंद्र, जयपूर (राजस्थान) येथे तयार करण्यात आली असून, ही मूर्ती 10 फेबुवारी रोजी राजस्थानहून जर्मनीकडे रवाना करण्यात आली आहे. तसेच देहू देवस्थान संस्थानच्या वतीने संत तुकाराम महाराजांची अडीच फूट उंचीची मूर्ती तयार करण्यात आली असून, 13 फेबुवारी रोजी विजया एकादशीच्या दिवशी मुख्य मंदिरात विधिवत पूजा करून ही मूर्ती जर्मनीकडे रवाना करण्यात येणार आहे. या संपूर्ण उपक्रमात श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, औंध येथील श्रीकांत पाटील यांनी आळंदी व देहू देवस्थान संस्थान तसेच विठ्ठलधाम, जर्मनी यांच्यात समन्वयाची महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

जर्मनीतील ख्रिसचेम येथील श्री विठ्ठलधाम मंदिराला दरवर्षी हजारो परदेशी नागरिक भेट देत असतात. या मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या मूर्ती प्रतिष्ठापित झाल्यास परदेशी भाविकांना संतांच्या आध्यात्मिक कार्याची ओळख होईल, तसेच भागवत धर्माच्या प्रचार-प्रसाराला जागतिक स्तरावर चालना मिळेल, असे मत दोन्ही देवस्थान संस्थानांच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT