

पिंपरी: पुण्यातील प्रवेशद्वार ठरणारा तसेच, बहुचर्चित सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाची बाणेर बाजूची मार्गिकरा वाहतुकीसाठी लवकरच सुरू होणार आहे. येथून वाहतूक सुरू झाल्यास विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात अडकणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळू शकेल. दीड वर्षानी उशिरा का होईना हा पूल नागरिकांच्या सेवेत दाखल होईल.
या एकात्मिक दुमजली उड्डाण पुलाची बाणेर बाजूची’ मार्गिका (रॅम्प) या आठवड्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुली होणार आहे. यामुळे बाणेरकडून शिवाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या केवळ दिशादर्शक फलक लावण्याचे काम सुरू असून, ते येत्या दोन-तीन दिवसांत ते काम पूर्ण होईल. औंध-शिवाजीनगर मार्गिका यापूर्वीच ऑगस्ट 2025 मध्ये सुरू झाली होती, आता बाणेर मार्गिका सुरू झाल्याने चौकातील वाहतुकीचा 50 टक्के ताण कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यामुळे मेट्रो तीन चे काम आणखी गतीने पूर्ण होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. बाणेरची मार्गिका सुरू होत असली तरी, पाषाण बाजूच्या रॅम्पसाठी पुणेकरांना आणखी दोन ते तीन महिने वाट पाहावी लागणार आहे. जलवाहिनीची दुरुस्ती आणि इतर तांत्रिक कामांमुळे या भागाचे काम प्रलंबित राहिल्याने त्याला अवधी लागू शकतो.
उड्डाण पुलासोबतच हिंजवडी-शिवाजीनगर या मेट्रो मार्गिका-3 बाबतही महत्त्वपूर्ण माहिती असून, संपूर्ण 23 किलोमीटरच्या टप्प्यावर मेट्रोची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. सध्या स्थानकांची कामे वेगाने सुरू असून, एप्रिल 2026 पर्यंत ही मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
असा आहे प्रकल्प...
1. एकूण लांबी : 1.7 किलोमीटर (दुमजली संरचना).
2. रचना : खालच्या स्तरावर उड्डाणपूल आणि वरच्या स्तरावर मेट्रो मार्ग.
3. खर्च : सुमारे 277 कोटी रुपये.
4. विलंब: 2020 मध्ये जुना पूल पाडून कामाला सुरुवात.
5. विविध कारणांनी प्रकल्पास विलंब.