पिंपळे गुरव: पिंपरी वल्लभनगर एसटी आगार परिसरात नाथ जल या अधिकृत ब्रॅण्डचे पाणी विक्रीस ठेवण्यात येते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आवारात केवळ नाथ जलच विकण्याची परवानगी दिली असून, एका लिटरच्या बाटलीची निश्चित किंमत 15 रुपये बंधनकारक आहे. मात्र, प्रत्यक्षात विक्रेते कूलिंग चार्जच्या नावाखाली प्रवाशांकडून प्रत्येकी पाच रुपये अतिरिक्त आकारत असल्याचे उघडकीस आले आहे.
विक्रेत्यांकडून आकारला जाणारा हा अनधिकृत दर प्रवाशांच्या खिशावर थेट परिणाम करणारा ठरत आहे. महागाईच्या काळात एसटी स्थानकातही पाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. किमतीपेक्षा अधिक दराने पाण्याची बाटली विक्री करणे दंडनीय असून, याबाबत तक्रार केल्यास कारवाईची स्पष्ट तरतूद असतानाही प्रवासी तक्रार नोंदवत नाहीत. त्यामुळे संबंधित विक्रेत्यांचे फावत असल्याचे चित्र आहे.
एसटी प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार, स्थानक परिसरात केवळ अधिकृत नाथ जलच उपलब्ध असावे, असे निर्देश आहेत. तरीही काही विक्रेते बाहेरील कंपन्यांच्या बाटल्या आणून सर्रास विक्री करत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाचा महसूल बुडत असून, स्थानक प्रमुखांचे या प्रकाराकडे लक्ष नसल्याची चर्चा प्रवाशांत सुरू आहे.
कुलिंगसाठी अतिरिक्त चार्ज
एसटी प्रशासनाने कारवाईसाठी प्रवाशांनी तक्रार करणे आवश्यक आहे. परंतु कोणीही तक्रार करत नाही हे कारण देत थेट कारवाईला टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. नाथ जलच्या विक्रीतून मिळणाऱ्या कमिशनपेक्षा बाहेरील कंपन्यांचे पाणी विकून अधिक नफा मिळत असल्याने काही विक्रेते नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचीही माहिती पुढे येत आहे. कूलिंगसाठी अतिरिक्त पाच रुपये आकारल्याचा दावा विक्रेते करतात; परंतु नाथ जलच्या निश्चित किमतीत कोणताही अतिरिक्त शुल्क आकारण्यास मनाई असून, आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे वास्तव समोर आले आहे.
महागाई एवढी वाढलेली असताना नाथ जलच्या पाणी बाटलीसाठी ज्यादा पैसे द्यावे लागतात. स्टॉलधारकांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे.प्रवासी
एसटी स्थानकात तक्रारीची सोय
राज्यभरातील कोणत्याही एसटी स्थानकावर नाथ जलसाठी १५ रुपयांपेक्षा अधिक रकमेची मागणी झाल्यास संबंधित आगार व्यवस्थापक किंवा स्थानक प्रमुखांकडे तक्रार करता येते. तक्रारीनंतर चौकशी करून जादा दर घेणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईची तरतूद आहे.
सदर प्रकरणाची पाहणी करण्यासाठी डीटीओ शिंदे यांना पाठवले जाईल. तसेच आगर व्यवस्थापकांना नाथ जल पाण्यासाठी रुपये 15 आकारण्याबाबतचा फलक तत्काळ लावण्याच्या सूचना देण्यात येतील. जेणेकरून प्रवासी ठरवलेले शुल्क अदा करतील. प्रवाशांना कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास ती आगार व्यवस्थापकांकडे नोंदवावी. अनधिकृत रित्या पाच रुपये जरी अधिक घेतले असतील तरी संबंधितावर रुपये 1000 दंड आकारण्यात येईल.अरून सिया, पुणे विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ
इतर ब्रँडचे पाणी सर्रास विक्री
प्रवाशांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने विक्रेते बिनधास्तपणे जादा दर आकारत आहेत. या प्रकरणी एसटी आगार व्यवस्थापक पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. अधिकृत नाथ जल विक्रीचे स्पष्ट आदेश असतानाही अन्य ब्रँडचे पाणी विक्रीस ठेवणे आणि जादा दर आकारणे हे नियमांचे उघड उघड उल्लंघन असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वल्लभनगर आगार प्रमुखांनी या प्रकाराकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
बस स्थानकातील स्टॉलधारकांकडून नाथ जल पाण्याच्या बाटलीसाठी निर्धारित दरापेक्षा जादा पैसे आकारल्याची तक्रार वारंवार प्राप्त होते. निर्धारित दर पंधरा रुपये असताना त्यापेक्षा अधिक रक्कम घेण्यात आल्यास संबंधित स्टॉलधारकांवर पुन्हा दंडात्मक कारवाई करण्यात येईल.पल्लवी पाटील, वल्लभनगर, आगार व्यवस्थापक