वल्लभनगर: सवलतीच्या प्रवासासाठी भविष्यात नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एनसीएमसी) अनिवार्य होणार आहे. या पार्श्वभूमीवर वल्लभनगर एसटी आगारात ज्येष्ठ नागरिक, महिला, आजारी रुग्ण आणि गर्भवती महिलांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अपुरे मनुष्यबळ आणि एकाच कर्मचाऱ्यावर कार्ड नोंदणीचा भार असल्याने नागरिकांना सकाळपासून पाच-पाच तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. कार्ड नोंदणीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून नागरिक रांगेत उभे राहत असल्याने ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
वल्लभनगर आगारात एनसीएमसी कार्ड नोंदणीची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी आहे. दररोज अंदाजे २०० कार्डांची नोंदणी केली जाते. मात्र, वाढत्या गर्दीच्या तुलनेत केवळ एकाच कर्मचाऱ्यावर संपूर्ण प्रक्रिया अवलंबून असल्याने नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागत आहे. नोंदणी केल्यानंतरही कार्ड मिळण्यासाठी तब्बल ४५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
पिंपरी, कासारवाडी, पिंपळे गुरव यांसह भोसरी, निगडी, मोशी, चिखली, तळेगाव, दिघी परिसरातून नागरिक एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी वल्लभनगर आगारात येत आहेत. दूरवरून आलेल्या नागरिकांना दिवसभर रांगेत बसावे लागत असल्याने ज्येष्ठ नागरिक, आजारी रुग्ण आणि गर्भवती महिलांची मोठी गैरसोय होत आहे.
पाच वाजेपर्यंत टोकन; त्यानंतर 'उद्या या'
कार्ड नोंदणीसाठी नागरिकांना टोकन दिले जाते. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जेवढ्या महिलांना टोकन दिलेले असते, तेवढ्याच महिलांची नोंदणी केली जाते. त्यानंतर रांगेत असलेल्या महिलांना 'आता वेळ संपली आहे, उद्या या,' असे सांगितले जाते. दिवसभर रांगेत थांबल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी आगारात हेलपाटा मारावा लागू नये, यासाठी काही महिला नाईलाजाने, 'थोडे अतिरिक्त पैसे घ्या; मात्र आम्हाला पुन्हा हेलपाटा मारायला लावू नका,' अशी विनंती करीत असल्याचे सांगण्यात येते.
महिलांमध्ये वाद; सुरक्षारक्षकांवर अतिरिक्त ताण
मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने रांगेतील महिलांमध्ये अनेकदा आपापसांत वादविवाद होत आहेत. गर्दी नियंत्रणासाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना हे वाद सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. स्वतंत्र रांगा, टोकन व्यवस्थेत पारदर्शकता आणि पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सवलतीच्या प्रवासासाठी कार्ड
शासनाने एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांना ७५ ते १०० टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर केली आहे. भविष्यात एनसीएमसी कार्ड अनिवार्य होण्याची शक्यता असल्याने नागरिकांची कार्ड काढण्यासाठी धावपळ सुरू आहे. मात्र, नोंदणी केल्यानंतर कार्ड मिळण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
अतिरिक्त कर्मचारी, स्वतंत्र खिडक्यांची गरज
वाढती गर्दी लक्षात घेता एसटी प्रशासनाने तातडीने अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावेत. दोन ते तीन स्वतंत्र संगणक खिडक्या सुरू कराव्यात. ज्येष्ठ नागरिक, महिला, गर्भवती महिला आणि आजारी रुग्णांसाठी स्वतंत्र रांग किंवा स्वतंत्र काउंटर उपलब्ध करून द्यावे.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत जेवढ्या महिलांना टोकन दिले जाते तेवढ्यांचीच नोंदणी केली जाते. त्यानंतरच्या महिलांना उद्या या असे सांगितले जाते. दिवसभर थांबून पुन्हा हेलपाटा मारण्यापेक्षा काही महिला नाईलाजाने अतिरिक्त पैसे देण्यास तयार होतात. मात्र, तीनशे रुपये घेतल्यानंतर 199 रुपयांचीच पावती दिली जात असल्याचा प्रकार गंभीर असून, याची एसटी प्रशासनाने चौकशी करावी.नंदिनी सोनवणे, ज्येष्ठ महिला.
संध्याकाळी साडेपाचनंतर केंद्र बंद होते. नोंदणीची प्रक्रिया सकाळी १० ते ५.३० वाजेपर्यंत आहे. या वेळेत नोंदणी करणाऱ्या नागरिकांकडून 199 रुपये शुल्क घेतले जाते. ज्या महिलांकडून जास्तीचे पैसे घेतले असतील, त्यांनी माझ्याकडे तक्रार करावी.पल्लवी पाटील, आगार प्रमुख