

लोणावळा: लोणावळा शहरामध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीला टाटा कंपनीचे चुकीचे धोरण कारणीभूत ठरले आहे. टाटा कंपनीने शहरातील पूरग्रस्तांचे दायित्व स्वीकारावे व नागरिकांना योग्य प्रकारे मदत करावी. अन्यथा टाटा कंपनी विरोधात जनतेला सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, आरोग्य समितीचे सभापती धनंजय काळोखे, पाणीपुरवठा समितीचे सभापती जीवन गायकवाड, नगरसेवक निखिल कवीश्वर व दत्तात्रय येवले यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाच, सहा व सात जुलै रोजी लोणावळा शहरामध्ये अतिवृष्टी झाली. त्यातच टाटा कंपनीने मान्सून लेकमधील पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे, या धरणातील पाणी सांडव्यावरून शहरामध्ये घुसले. नागरी वस्त्यांमध्ये आठ ते दहा फुटांपर्यंत पाणी घुसल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल झाले. अजूनही नागरिक स्थिरस्थावर झालेले नाहीत. अशा परिस्थितीमध्ये टाटा कंपनीने शहरातील पूरग्रस्तांचे दायित्व स्वीकारावे व त्यांना चांगल्या पद्धतीची मदत करावी अन्यथा टाटा कंपनीच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा इशारा नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधींकडून देण्यात आला आहे. गुरुवारी टाटा कंपनीच्या विरोधात हा मोर्चा होणार होता. मात्र, टाटा कंपनीचे अधिकारी व आमदार सुनील शेळके यांच्यामध्ये या मदत कार्याबाबत चर्चा सुरू असल्याने तूर्तास हा मोर्चा थांबविण्यात आला आहे.
शहरात 1900 नुकसानग्रस्त कुटुंब
नागरिकांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी नगर परिषद सर्व स्तरावर प्रयत्न करत आहे. ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे, त्या सर्व नागरिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. शहरामध्ये 1900 नुकसानग्रस्त कुटुंब असल्याचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी सांगितले.
पूरपरिस्थितीला कंपनीच जबाबदार असल्याचे अधिकाऱ्यांनी केले मान्य
आता निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीला टाटा कंपनीचे धोरण कारणीभूत असल्याचे टाटा कंपनीच्या अधिकाऱ्यानेदेखील आढावा बैठकीत मान्य केले आहे. त्यामुळे टाटा कंपनीने नागरिकांना मदत करावी व या पुढील काळामध्ये शहरांमध्ये पूर परिस्थिती होणार नाही, याकरिता योग्य धोरण ठरवावे व त्या पद्धतीने कामे करावेत, अशीदेखील मागणी या लोकप्रतिनिधींनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
नदी, नाल्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा
लोणावळा शहरातील नदी नाल्यांमध्ये जी अतिक्रमणिक उभी राहिली आहेत ती कोणाच्या काळामध्ये उभी राहिली याचा खुलासा करावा. ज्या ठेकेदारांनी शहरामध्ये चुकीची कामे केली त्यांच्यावर काय कारवाई केली याचीदेखील माहिती त्यांनी आरोप प्रत्यारोप करण्यापूर्वी द्यावी, असे खुले आव्हान पत्रकार परिषदेत लोकप्रतिनिधींनी विरोधकांना दिले आहे.