Vallabhnagar Bus Depot Pudhari
पिंपरी चिंचवड

Vallabhnagar Bus Depot: वल्लभनगर आगारात सुविधांचा बोजवारा; कर्मचाऱ्यांना पाण्याची टंचाई, सापांचा वावर अन् प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न

स्वच्छतागृहात पाणी नाही, वॉशिंग सेंटरमध्ये लाखो लिटरचा वापर; साचलेल्या पाण्यात डासांचा उपद्रव, रात्री मद्यपींच्या वावराने महिला प्रवाशांची चिंता

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे परिवहन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वल्लभनगर आगारातच सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रवाशांना सेवा देणाऱ्या 'लालपरी'ची दुरुस्ती आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच पाणी, स्वच्छतागृह आणि सुरक्षिततेसाठी संघर्ष करावा लागत असल्याची धक्कादायक परिस्थिती आहे. एकीकडे आगारातील स्वच्छतागृहात पाण्याचा थेंब नाही, तर दुसऱ्या बाजूला बस धुण्याच्या केंद्रात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याचे दिसून येते.

स्वच्छतागृहात पाणीच नाही; कर्मचाऱ्यांची धावपळ

आगारातील यांत्रिकी विभाग आणि मॅकेनिक कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी स्वच्छतागृहाची सुविधा असूनही त्याचा वापर करणे कठीण झाले आहे. पाइप जाम झाल्याने पाणीपुरवठा बंद असून, प्लंबिंगचा पाइपही तुटल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आगाराबाहेरील स्वच्छतागृहाचा आधार घ्यावा लागत आहे. यामुळे वेळही वाया जात असल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार केली जात आहे.

एकीकडे टंचाई, दुसरीकडे मुबलकता

वॉशिंग सेंटरवर गाड्या धुताना मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते. लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र दिसत असताना कर्मचाऱ्यांच्या वापरासाठी असलेल्या स्वच्छतागृहात मात्र पाण्याचा थेंबही उपलब्ध नसणे, ही व्यवस्थेची विसंगती अधोरेखित करणारी बाब आहे. पाण्याचा पुनर्वापर अथवा योग्य नियोजन करण्याची गरज यानिमित्ताने पुढे आली आहे.

पाण्याच्या बाटलीच्या दरातही मनमानी?

आगारात 'नाथजल' पाण्याची बाटली १५ रुपयांची असताना ती २० रुपयांना विकली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधित यंत्रणेने दरफलक, विक्रीदर आणि प्रत्यक्ष आकारणी याची तपासणी करण्याची गरज आहे असे नागरिक मागणी करत आहेत. स्वच्छतागृहातील पाणीपुरवठ्याबाबत पाइप जाम झाल्याने पाणीपुरवठा बंद आहे तसेच प्लंबिंगचा पाइप तुटल्याने लवकरच दुरुस्त करत आहोत .स्वच्छतेबाबतही सुचना दिल्या असल्याचे आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील यांनी सांगितले.

पाणी साचले, खड्डे वाढले; डासांचा उपद्रव

वॉशिंग सेंटर आणि वाहन परीक्षण कक्षाच्या परिसरात पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याचे खड्डे देखील पडले आहेत. खड्ड्यात पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव आणि दुर्गंधी पसरली आहे. चिखल आणि साचलेल्या पाण्यातून ये-जा करताना कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

सापांचा वावर; कर्मचाऱ्यांमध्ये भीती

आगार परिसरातील अस्वच्छता, साचलेले पाणी आणि राडारोड्यामुळे घोणससारख्या सापांचा वावर वाढल्याची तक्रार आहे. त्यामुळे यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत असल्याचे चित्र आहे. प्रवासी परिसरातही अस्वच्छता कायम असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

रात्री मद्यपींचा अड्डा? महिला प्रवाशांची चिंता

बसस्थानक परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपींचा वावर असतो. परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या पडलेल्या आढळून येते. यामुळे विशेषतः महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या भागात प्रभावी गस्त गरजेचीआहे.

कुंड्याही गायब

आगाराच्या सुशोभीकरणासाठी लावण्यात आलेली रोपे कुंड्यांमधून गायब झाली असून काही ठिकाणी झाडांच्या बुंध्याशीच राडारोडा टाकण्यात आला आहे. उघड्या स्ट्रॉर्म वॉटर लाईनची झाकणेही धोकादायक स्थितीत असल्याचे दिसते. प्रवाशांसाठी असलेल्या सूचना व मदत कक्षातून योग्य सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारीही आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT