चऱ्होली: ऐन थंडीच्या दिवसात प्रत्येकाला घरी जाण्याची घाई असताना चऱ्होलीच्या तापकीर चौक ते मोशी खडी मशीन चौकापर्यंत तसेच पुणे-नाशिक मार्गावरील गोदाम चौक, पुणे आळंदी मार्गावरील तापकीर चौक आदी भागांत दररोज वाहतूक कोंडी होत आहे. येथील कोंडी कधी फुटणार, असा प्रश्न स्थानिक नागरिक व वाहनचालक करत आहेत. नागरिकांनी अनेकवेळा तक्रार करूनही काहीही उपयोग होत नाही, असा सार्वत्रिक अनुभव आहे.
वडमुखवाडी येथील तापकीर चौकात शुक्रवारी सायंकाळी साडेसहा ते रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. अलंकापुरम मार्गावर तसेच पालखी मार्गावर वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. या कोंडीतून आमची कधी मुक्तता होणार, असा सवाल नागरिक तसेच वाहनचालक करत आहेत.
तापकीर चौकात सिग्नल व्यवस्था सुरू असून देखील वाहतूक कोंडी होणार असेल तर नागरिकांनी काय करायचे? पुण्याहून आळंदीला येणारी वाहतूक, पुणे नाशिक रोडवरून अलंकापुरम रोड मार्गे येणारी औद्योगिक जड वाहतूक, चाकण औद्योगिक क्षेत्रातून आळंदीच्या चाकण चौकातून नवीन पुलावरून येणारी चाकरमान्यांची आणि औद्योगिक जड वाहतूक आणि मरकळ, धानोरे, सोळू या औद्योगिक पट्ट्यातून दोन्ही चऱ्होलींना जोडणाऱ्या पुलावरून दाभाडे चौक मार्गे छत्रपती संभाजी महाराज चौकात पुणे आळंदी रोडवर येणारी सर्व प्रकारची औद्योगिक वाहतूक या सर्व ठिकाणावरून येणाऱ्या वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होणे ही रोजचीच बाब झाली आहे.
मंगल कार्यालये, शिक्षण संस्थांमुळे कोंडी
पुणे-आळंदी पालखी मार्गावर दिघीपासून देहू फाट्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर लग्न कार्यालये आहेत. त्यामुळे या ठिकाणी स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असते. तसेच, कार्यालयातील वस्तूंची ने-आण करणाऱ्या मोठ्या गाड्यांमुळे परिसरातील सर्व वाहतुकीवर मोठा ताण पडतो. त्याचप्रमाणे, आजूबाजूला असणाऱ्या विविध शैक्षणिक संस्थांमुळे शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहतुकीची कायमच गर्दी असते. या सर्व वाहतुकीचा ताण मुख्यत्वे करून तापकीर चौक, चोवीसावाडी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक आणि आळंदी देहू या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या देहू फाटा चौक या ठिकाणच्या वाहतुकीवर येतो.
अरुंद रस्ता अन् अवजड वाहतुकीचा अडसर
पुणे-नाशिक रोडवरून अलंकापुरम मार्गे, चाकण औद्योगिक क्षेत्रातून आळंदी मार्गे आणि फुलगाव, मरकळ, धानोरे, सोळू या औद्योगिक पट्ट्यातून येणारी सर्व जड वाहतूक वडमुखवाडीच्या तापकीर चौकात एकत्र येत असल्यामुळे लहान वाहनांना ताटकळत उभे राहावे लागते. औद्योगिक क्षेत्रातून येणारे मोठे कंटेनर मालाने भरलेले असतात. त्यामुळे त्यांची संथगतीने वाहतूक सुरू असते. याचा दुष्परिणाम लहान वाहनांच्या गतीवर होतो. पुणे-आळंदी मार्गाने होणारी चाकरमान्यांची व विद्यार्थ्यांची त्यामुळे कुचंबणा होते.
वडमुखवाडीतील वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.सुनील काटे, प्रभाग अध्यक्ष, भाजपा चऱ्होली.
लग्नतिथीमुळे वाहतूक कोंडीत भर
वडमुखवाडीच्या तापकीर चौकात सिग्नल व्यवस्था सुरू असूनही पोलिस यंत्रणा वेळेवर हजर नसल्यामुळे वाहनचालकांनी अरेरावी करायला सुरुवात केली. त्यामुळे एकमेकांच्या पुढे जाण्याच्या नादात सर्व बाजूने वाहतूक कोंडी झाली. आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर लग्न कार्यालय असल्यामुळे एकाच वेळी सर्व ठिकाणची गर्दी रस्त्यावर आली आणि त्यामुळे वाहतुकीवर मोठा ताण निर्माण होऊन सर्वत्र वाहतुकीचा बोजवारा उडाला. बहुतांश वऱ्हाडीमंडळी कोंडीत अडकून पडल्याने वधू-वरांना आशीर्वाद देण्यापासून वंचित राहावे लागले.
लग्नसराईमुळे आणि कृषीसंमेलनामुळे मोठ्या प्रमाणावर या मार्गावर वाहनांची गर्दी आहे. आम्ही वाहतूक नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण गर्दी जास्त असल्यामुळे प्रयत्नांना मर्यादा येत आहे.शंकर डामसे, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग.