वडगाव मावळ: वडगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग््रेासचे सुनील गणेश ढोरे यांची बिनविरोध निवड झाली. तर स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे पंढरीनाथ राजाराम ढोरे व भाजपचे संदीप भास्करराव म्हाळसकर यांची नियुक्ती करण्यात आली.
पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांच्या उपस्थितीत आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या वेळी उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे सुनील ढोरे व भाजपच्या अर्चना म्हाळसकर यांनी अर्ज दाखल केले. दरम्यान, पक्षातील वरिष्ठांच्या सूचनेनुसार म्हाळसकर यांनी अर्ज मागे घेतल्याने सुनील ढोरे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तसेच नगरपंचायतमध्ये संख्याबळानुसार राष्ट्रवादीचा एक गट व भाजपचा एक गट स्थापन झाला असून, राष्ट्रवादीच्या वतीने पंढरीनाथ ढोरे व भाजपच्या वतीने संदीप म्हाळसकर यांना स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार, आज दोघांची स्वीकृत नगरसेवक म्हणून अधिकृत घोषणा करून नियुक्ती जाहीर करण्यात आली.
निवडप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, सुधाकर शेळके, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश ढोरे, भाजपचे ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर, काँग््रेासचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब ढोरे, नगराध्यक्षा अबोली ढोरे, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे आदींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुनील ढोरे यांनी यापूर्वी स्वीकृत नगरसेवक म्हणून काम केले असून, प्रभाग 11 मधून ते विजयी झाले आहेत. तसेच नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक पंढरीनाथ ढोरे हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष असून, तालुक्यातील सहकारी संस्थांवर त्यांनी काम केले आहे. तर संदीप म्हाळसकर हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते असून विविध सामाजिक संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत.
ढोरे, म्हाळसकर आडनावांचा योगायोग
गटनेतेपदी अजय म्हाळसकर व दिनेश ढोरे, विरोधी पक्षनेतेपदी अर्चना म्हाळसकर नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे 9 व एक अपक्ष तर भाजपचे 6 व एक अपक्ष असे दोन गट स्थापन झाले असून राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजय म्हाळसकर व पक्षनेता म्हणून माया चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच भाजपाच्या गटनेतेपदी दिनेश ढोरे, विरोधी पक्षनेते पदी अर्चना म्हाळसकर व पक्षप्रतोद म्हणून अनंता कुडे, समन्वयक म्हणून सारिका चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ढोरे, म्हाळसकर आडनावांचा योगायोग
नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक ढोरे विरुद्ध म्हाळसकर अशी झाली. त्यानंतर भाजपच्या गटनेतेपदी ढोरे व राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी म्हाळसकर आडनावांची नियुक्ती झाली. आज नियुक्ती झालेले दोन स्वीकृत नगरसेवकही ढोरे व म्हाळसकर याच आडनावाचे आहेत. उपनगराध्यक्ष पदासाठीही ढोरे व म्हाळसकर आडनावांचेच अर्ज होते. तसेच मागील पंचवार्षकिमध्ये पहिले उपनगराध्यक्ष म्हाळसकर व या पंचवार्षकिमध्ये पहिले उपनगराध्यक्ष ढोरे झाले आहेत. त्यामुळे शहरातील ढोरे व म्हाळसकर या दोन आडनावांचा योगायोग नव्हे तर शहरातील राजकारणात चांगली पकड असल्याचे दिसते.