वडगाव मावळ: महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभागाच्या माध्यमातून वडगाव मावळ येथे आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा तब्बल ३३२९ नागरिकांनी लाभ घेतला. तसेच, ३३७१ जिवंत सातबारा वाटप (साताबारा उताऱ्यावरील मृत खातेदारांची नावे कमी करणे आणि त्यांच्या कायदेशीर वारसांची नावे नोंदवणे) करण्यात आले.
वडगाव मावळ येथे भेगडे लॉन्समध्ये झालेल्या या शिबिराचा शुभारंभ विभागीय आयुक्त शीतल तेली, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार सुनील शेळके, अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, जिल्हा परिषदेच्या सभापती दीपाली हुलावळे, पंचायत समितीच्या सभापती सुनिता येवले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, रवींद्र भेगडे, तळेगावचे नगराध्यक्ष संतोष दाभाडे, लोणावळाचे नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, वडगावच्या नगराध्यक्ष अबोली ढोरे आदी उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री भेगडे यांनी याप्रसंगी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून राज्य सरकारने शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोचविण्याचा यशस्वी प्रयत्न केला असल्याचे सांगितले. तसेच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, त्याबद्दल विशेष अभिनंदन केले. गोल्डन पीस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळ तालुक्यातील जमिनीची जोपासना करण्याचे काम मावळवासीयांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यात विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगून विशेषतः सुमारे १५०० कुटुंबांना घरासाठी जागा उपलब्ध करून दिली. तसेच, शासनाचा निधी व सीएसआर निधीच्या माध्यमातून दिवाळीच्या आत त्यांना हक्काचे घरही देऊ, असे आश्वासन दिले. या वेळी विभागीय आयुक्त तेली, अप्पर जिल्हाधिकारी राऊत, प्रांताधिकारी नवले यांनीही मनोगत व्यक्त केले.
बचाव पथकांचा सन्मान
याप्रसंगी आपत्कालीन परिस्थितीत सदैव तत्पर राहून नागरिकांचे प्राण वाचवणाऱ्या मावळ तालुक्यातील शिवदुर्ग संस्था, वन्यजीव संरक्षण संस्था तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), पीएमआरडीए बचाव पथक या संस्थांच्या प्रतिनिधींचा व जवानांचा विशेष सन्मान करण्यात आला.
प्रांताधिकारी, तहसीलदारांचे लोकप्रतिनिधींकडून कौतूक
शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आमदार शेळके यांनी प्रांताधिकारी सुरेंद्र नवले व तहसीलदार विक्रम देशमुख यांचे विशेष अभिनंदन करत या वेळी मीच थोडा कमी पडलो असल्याची कबुली दिली. तसेच, आता माजी मंत्री भेगडेही माझ्यासोबत आहे, त्यामुळे पुढच्या वर्षी हे शिबिर ४ दिवसांचे करू, अशीही टिपण्णी केली. त्याचप्रमाणे माजी मंत्री भेगडे यांनीही जिल्ह्यात सर्वांत जास्त एसआयआरचे काम केल्याबद्दल तसेच तालुक्यातील एका आपत्तीग्रस्त कुटुंबाला मिळवून दिलेल्या शासकीय मदतीचे उदाहरण देत प्रांताधिकारी नवले व तहसीलदार देशमुख यांचे विशेष कौतूक केले.
योजनांचा लाभ मिळालेले लाभार्थी
महिला शेतकरी दर्जा प्रमाणपत्र वाटप : ११४
गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद : ३२८
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना : ४
शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करणे : १
तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषणा : २
घरकुल योजनेच्या लाभर्थ्यांसाठी विशेष तरतूद : ५१७
कुंभार समाजातील व्यक्तींना पारंपरिक व्यवसायासाठी सवलती : ४
शेतजमीनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी फी पूर्णपणे माफ : ३
राज्य शासकीय योजनांचा लाभ : २१८
केंद्र शासकीय योजनांचा लाभ : १०९
स्थानिक स्वाराज्य संस्थेच्या शासकीय योजनांचा लाभ : १६
इतर लाभ : २०१३
जिवंत सातबारा : ३३७१