Mahashivratri Celebration Vadgaon Maval Pudhari
पिंपरी चिंचवड

Mahashivratri Celebration Vadgaon Maval: वडगाव मावळ–लोणावळ्यात महाशिवरात्र भक्तिभावात साजरी

पोटोबा महाराज व जाखमाता देवींच्या पारंपरिक भाऊ-बहीण भेटीने वडगाव मावळात भक्तीचा उत्सव; लोणावळा व परिसरातील शिवमंदिरांत भाविकांची मोठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज व सांगवीचे ग्रामदैवत श्री जाखमाता देवी यांचा महाशिवरात्रीनिमित्त होणारा पारंपरिक भाऊ-बहीण भेटीचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. पोटोबा महाराज व श्री जाखमाता देवी यांचे बहीण-भावाचे नाते मानले जाते. दरवर्षी पोटोबा महाराजांची पालखी महाशिवरात्रीला सांगवी येथे इंद्रायणी नदीकाठी असलेल्या जाखमाता देवीच्या भेटीसाठी नेली जाते. ही परंपरा जुन्या काळापासून सुरू आहे. आजही पोटोबा महाराजांची पालखी भजन, अभंग म्हणत जाखमाता देवीच्या भेटीला गेली. या वेळी सांगवी ग्रामस्थांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले.

भाविकांनी केले स्वागत

देवस्थानचे विश्वस्त व सांगवी ग्रामस्थांच्या हस्ते इंद्रायणी नदीमध्ये पोटोबा महाराजांच्या मूर्तीस स्नान घातल्यानंतर पोटोबा महाराज व जाखमाता देवीची भेट घडविण्यात आली. तसेच, देवीची साडी-चोळीसह ओटी भरण्यात आली. दरवर्षी महाशिवरात्रीच्यानिमित्ताने होणारी ही भेट पारंपरिक भेट मानली जात असून, पालखी नदीवर जाताना व येताना नागरिकांनी ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करून दर्शनाचा लाभ घेतला.

या वेळी पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेश ढोरे, विश्वस्त चंद्रकांत ढोरे, तुकाराम काटे, अरुण चव्हाण, सुभाषराव जाधव, भास्करराव म्हाळसकर, विणेकरी बबनराव भिलारे, पंढरीनाथ भिलारे, महादू खांदवे, बारकू खांदवे, विठ्ठलराव ढोरे, मधुकर पानसरे, शंकरराव पगडे, सोमनाथ काळे, अनिल कोद्रे, पुजारी अशोक गुरव, शरद गुरव, कैलास खांदवे, रवींद्र म्हाळसकर, नारायण ढोरे, दिनेश तुमकर, सोपान आगळमे, मधुकर टकले, रवींद्र तुमकर, योगेश ढोरे, भाऊसाहेब ढोरे, बाळासाहेब तुमकर, मृदंगमणी आढारी आदी उपस्थित होते.

महादेव, ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी

महाशिवरात्रीनिमित्त येथील पुरातन महादेव मंदिरामध्ये देवस्थान विश्यांर्वस्तांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. तसेच, येथील पेशवेकालीन तळ्याजवळील ओंकारेश्वर मंदिरामध्ये सोमनाथ धोंगडे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. जोतिबा भजनी मंडळ इंदोरी, पोटोबा महाराज भजनी मंडळ, काकड आरती भजनी मंडळ वडगाव याचे भजनाचे कार्यक्रम पार पडले. या वेळी दोन्ही मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

लोणावळा शहर व परिसरामध्ये महाशिवरात्र मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणामध्ये साजरी करण्यात आली. लोणावळा शहरातील रायवूड उद्यान येथील स्वयंभू सिद्धेश्वर मंदिरासह गावोगावी असलेल्या भगवान महादेवाच्या मंदिरांमध्ये भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या.

कुरवंडे या गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या नागफणी (ड्युक्स नोज) या ठिकाणी असलेल्या स्वयंभू नागफणेश्वर या लिंगावर मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिवभक्तांकडून रुद्राभिषेक करण्यात आला. तेव्हापासून या ठिकाणी दर्शनासाठी स्थानिक ग्रामस्थ व लोणावळा शहर व परिसरामधील तरुणांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

लोणावळा शहराच्या गावठाण भागामध्ये असलेल्या रायवूड उद्यानातील स्वयंभू सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास देवस्थानचे विश्वस्त व पदाधिकारी यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. तेव्हापासून देवालय भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. पहाटे साडेपाच वाजल्यापासून या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी करत रांगा लावल्या होत्या. सकाळी कामानिमित्त बाहेर जाणारे नागरिक लवकरच दर्शनासाठी या ठिकाणी आले होते. रविवार हा सुटीचा दिवस असल्यामुळे सकाळ व सायंकाळच्या सत्रामध्ये मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत होते.

फराळाचे वाटप

विविध प्रकारच्या खेळण्याची दुकाने तसेच मोठंमोठे पाळणे हे भाविकांचे विशेषता: लहान मुले व महिलांचे आकर्षण केंद्र ठरत होते. रायवूड उद्यान हे वनविभागाच्या अखत्यारीत असून, उंच उंच व शेकडो वर्षांपूर्वीचे डेरादार असे वृक्ष या ठिकाणी आहेत. या गर्द झाडीमध्ये व शांत वातावरणामध्ये भाविक निवांतपणे बसून फराळाचा आनंद घेत होते. वेगवेगळ्या संस्थांकडून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना मोफत खिचडी तसेच फराळाच्या विविध वस्तूंचे वाटप करत होते.

पोलिसांंचा बंदोबस्त

वलवन गावामध्ये असलेले महादेव मंदिर, नांगरगाव येथील सोमनाथ महादेव, ओळकाईवाडी येथील शंकर मंदिर, तुंगार्ली गावातील तुंगारलेश्वर मंदिर, खंडाळा गावातील निळकंठेश्वर मंदिर, जुना खंडाळा येथील शिव मंदिर, कार्ला गावातील पुरातन शिवमंदिर, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला अशा वेगवेगळ्या भागांमध्ये असलेल्या भगवान महादेवाच्या मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी व पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी दिवसभर भाविकांची गर्दी व रांग पाहायला मिळाली. सर्वत्र शांततेमध्ये व मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये महाशिवरात्र साजरी करण्यात आली. लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पोलिसांच्यावतीने बंदोबस्त ठेवण्यसात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT