अमिन खान
तळेगाव दाभाडे: लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या निवडणुकांमुळे मतदानाचा अधिकार बजावण्याच्या हक्काबरोबरच हंगामी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. मात्र, तब्बल आठ वर्षांनंतर तळेगावकरांना मिळणाऱ्या या संधी यंदा सीमित झाल्या आहेत.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अंतिमतः तीन उमेदवार ठाम राहिल्याने मात्र सर्वच्या सर्व 64 हजार 676 मतदारांना त्यासाठी मतदान करता येणार आहे.तळेगाव दाभाडे शहरातील एकूण मतदारांची संख्या 64 हजार 676 इतकी आहे. एकूण 28 पैकी 19 जागांवर बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे येथील सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क वापरण्याची संधीच मिळणार नाही. या 19 जागांच्या प्रभागातील संपूर्ण मतदानापासून वंचित रहाव्या लागलेल्या मतदारांची एकूण संख्या तब्बल 50 हजार 739 इतकी आहे. त्यासर्वाना मतदानाच्या अधिकारापासून हूल देण्यात आली आहे.
त्याबाबत प्राप्त माहितीचे विश्लेषण केले असता धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बिनविरोध 19 जागांमध्ये 11 प्रभागांचा समावेश आहे. तेथे दोन नगरसदस्यांसाठी करावयाच्या दोन्ही मतदानाचा अधिकार गमवावा लागलेल्या मतदारांची संख्या 37 हजार 698 इतकी आहे. तर, तीन प्रभागात एक उमेदवार बिनविरोध असल्याने तेथील 13 हजार 41 मतदारांना केवळ एकच मत टाकता येणार आहे. ज्या तीन प्रभागात प्रत्येकी दोन्ही जागांसाठी उमेदवार आहेत, तेथील 13 हजार 937 मतदारांना मात्र संपूर्ण मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
संपूर्ण मतदान होणारे प्रभाग तीन आहेत. प्रभाग 3 मध्ये 5 हजार 635 मतदार, प्रभाग 8 मध्ये 4 हजार 772 आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये 3 हजार 530 असे एकूण 13 हजार 937 मतदार असे आहेत, ज्यांना दोन नगरसदस्य उमेदवार आणि एक नगराध्यक्ष निवडण्याचा मतदानाचा संपूर्ण अधिकार मिळाला आहे.
2 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या एका उमेदवारासाठी सर्वांना मतदान करता येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या प्रभागात निवडणूक लागली आहे, केवळ त्याच प्रभागातील मतदारांना नगरसदस्यपदाच्या एक किंवा दोन उमेदवारांसाठी मतदानाचा अधिकार बजावता येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी काल जाहीर केलेल्या माहितीनुसार, तळेगाव नगर परिषदेच्या या सार्वत्रिक निवडणुकीत 28 जागांपैकी 19 जागांवर केवळ एकच उमेदवारी अर्ज राहिला आहे. तसेच, इतर प्रभागांमधील 9 जागांवर दोन किंवा त्यापेक्षा अधिक उमेदवार वैध ठरल्याने तेथे मतदान घेणे क्रमप्राप्त आहे.