तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस भाजप महायुती होणार की स्वबळावर लढणार? याबाबत गेल्या 40 दिवसांपासून चाललेला राजकीय गोंधळ आणि ताणतणाव अखेर संपुष्टात आला आहे. दोन्ही हातांनी दिलेली टाळी अखेर वाजली आहे. त्यानुसार, जागावाटपाच्या 17/11 च्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
महायुती म्हणून संयुक्तपणे ही निवडणूक लढविण्याचा निर्णय दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे आणि भाजपाचे प्रभारी गणेश भेगडे यांनी महायुती झाली असल्याच्या निर्णयाची घोषणा केली.
राष्ट्रवादी काँग्रेसला 17 जागा
पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँंग्रेसचे शहराध्यक्ष सुरेश धोत्रे, गणेश काकडे, सुहास गरुड तर भाजपचे चिराग खांडगे, संतोष दाभाडे उपस्थित होते. महायुतीच्या या निर्णयात राष्ट्रवादी काँग्रेसला 17 जागा तर भाजपला 11 जागा असे वाटप झाले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना त्यांचे अधिकृत उमेदवार आपापल्या निवडणूक चिन्हांवर उभे करण्याची संधी मिळाली आहे. तळेगावच्या राष्ट्रवादी आणि भाजप पक्षांच्या राजकीय वर्तुळात उठलेले अनिश्चिततेचे वादळ शमण्यास सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादीने त्यांच्या वाट्याच्या 17 जागांपैकी 14 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. उर्वरित तीन उमेदवारांची नावे शनिवारी जाहीर करण्यात येणार असल्याचे खांडगे यांनी सांगितले. तर भाजपतर्फे या वेळी नगराध्यक्ष उमेदवार आणि 7 उमेदवारांच्या नावांची यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविली असून, उर्वरित चार नावांसह एकूण 12 उमेदवारांची नावे प्रदेश पातळीवरून जाहीर केली जातील, असे गणेश भेगडे यांनी सांगितले.
नगराध्यक्षपदासंदर्भात तीन दिवसांपूर्वी महायुतीत झालेला निर्णय यथावत ठेवण्यात आला आहे. त्यानुसार महायुतीतील भाजपचा पहिला चेहरा म्हणून संतोष दाभाडे नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार असणार आहेत. तर, अडीच वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश मोहनराव काकडे यांना नगराध्यक्षपदाची संधी देण्यावर भाजपने सहमती दिली असल्याचे भेगडे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आज जाहीर केलेले अधिकृत उमेदवार
प्रभाग 6 : शैलजा कैलास काळोखे, प्रभाग 8 : मनिषा हनुमंत म्हाळसकर, प्रभाग 10 : मजनू हणुमंत नाटेकर, प्रभाग 11 : कमल नामदेव टकले, प्रभाग 12 : सोनाली गोरख दरेकर.
भाजपने प्रदेशाध्यक्षांकडे शिफारस केलेली उमेदवारांची नावे
नगराध्यक्षपद : संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील. प्रभाग क्रमांक 1 अ : निखिल उल्हास भगत, प्रभाग क्रमांक 2 अ : विभावरी रवींद्रनाथ दाभाडे, प्रभाग क्रमांक 3 अ : प्रिया विकी लोखंडे, प्रभाग क्रमांक 4 अ : सिया लक्ष्मण चिमटे, प्रभाग क्रमांक अ : चिराग सुरेश खांडगे, प्रभाग क्रमांक 11 ब : इंद्रकुमार राजमल ओसवाल, प्रभाग क्रमांक 12 ब : विनोद अशोक भेगडे.