Election Campaign Pudhari
पिंपरी चिंचवड

Election Campaign: तळेगाव नगर परिषद निवडणुकीपूर्वी मतदारांना लुभावण्यासाठी इच्छुकांचा छुपा प्रचार!

पक्षादेशाची वाट न बघता साड्या, नोटा आणि भेटवस्तूंचे वाटप | सोशल मीडियावर नवख्या इच्छुकांची झुंबड

पुढारी वृत्तसेवा

अमिन खान

तळेगाव दाभाडे: तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच गुढघ्याला बाशिंग बांधून काही नवखे इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या प्रचार मंडपात धुमाकूळ घालत आहेत. आपापल्या प्रभागातील मतदारांना लुभावण्यासाठी भेटवस्तूंनी लादलेले टेम्पो, रिक्षा घेऊन त्यांच्या विश्वासार्ह कार्यकर्त्यांची टोळकी दारोदारी धाडण्यास सुरुवात केली आहे. काही प्रभागात एकाच पक्षातील तीव इच्छुकांमध्ये साड्या, गृहोपयोगी वस्तू अन्‌‍ नोटा मतदारांना वाटप करण्याची चढाओढ लागली आहे. विशेष म्हणजे पक्षादेशाची वाट न बघता छुपा पूर्वप्रचार करण्यात धनदांडग्या इच्छुक मंडळींनी यात आघाडी घेतली असल्याची चर्चा सुरू आहे. (Latest Pimpri chinchwad News)

मागील महिन्याभरापासून सोशल मीडियावर इच्छुकांच्या पोस्ट्‌‍सनी धुमाकूळ घातला आहे. केलेल्या अन्‌‍ न केलेल्या कामांना आपल्या सामाजिक योगदानाचा मुलामा फासून फेसबुक आणि इन्स्टाग््राामवर सदर रिल्स ठासून टाकल्या जात आहेत. प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या 3 ते 4 हजारच्या दरम्यान असल्याने काहींनी गेल्या 15 दिवसांपूर्वी खासगी सर्व्हेही करून घेतले आहेत. त्यातून प्राप्त माहितीच्या आधारे ते मतदारांशी मोबाईल, व्हाट्‌‍सअप्पवर सतत संपर्कात आहेत. काही राजकीय नेत्यांनी ‌‘कामाला लागा‌’, असा आदेश दिल्याचा दावा करणाऱ्यांनी मतदारांच्या दारावर सदिच्छा भेट दौरे न्यायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, अंतिम मतदार यादीच्या प्रतीक्षेत न राहता 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांचा संदर्भ घेत पैश्यावाल्या इच्छुकांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराचे नीटनेटके व्यवस्थापन केले आहे. संपर्क कार्यालयात त्यांनी प्रोफेशनल अनुभवी आणि सोशल मीडिया हॅन्डलर्स यांना कामावर ठेवले आहे.

विशेष म्हणजे माजी नगरसेवकांपेक्षा राजकारणात नव्यानेच उदयास आलेल्यांची संख्या यंदा मोठी आहे. मित्रपरिवार, नातेसंबंधातील मंडळी आणि जवळच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून एकला चलोचा हा त्यांचा प्रचार चर्चेचा विषय झाला आहे. गाव भागापेक्षा स्टेशन भागातील इच्छुकांमध्ये एकचढ एक दाखविण्याची स्पर्धा लागली आहे. फ्लेक्सबाजीमुळे स्वच्छ तळेगाव, सुंदर तळेगाव या उपक्रमाचे तीनतेरा वाजल्याचे चित्र आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मतदारांच्या घरांना भेटी दिलेल्या कार्यकर्त्यांचे फुटेज काही ठिकाणी उपलब्ध आहे. आचारसंहिता लागू झाली नसल्याने हे कार्यकर्ते बिनधास्त आहेत. दिवाळी, भाऊबीज भेट म्हणून ती स्वीकारायची गळ ते मतदारांच्या घरातील मंडळींना घालत आहेत. कट्टर पक्षीय विरोधकांच्या दारावर ते जात नाहीत. जवळपास 99 टक्के लोक भेट स्वीकारतात; मात्र काहीजण स्पष्ट नकार देत आहेत. आचारसंहिता लागू झाल्यावरही असे प्रकार सुरू राहिले आणि जर याबाबत तक्रार झाली तरच कायदेशीर कारवाई होऊ शकेल, अशी भावना एका जागरूक मतदाराने व्यक्त केली आहे.

मतदान केंद्रांची यादी 7 नोव्हेंबरला

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 31 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. आता मतदान केंद्रांची यादी 7 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी माहिती संकेतस्थळावर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT