Talegaon Dabhade Ganeshotsav Meeting Pudhari
पिंपरी चिंचवड

Talegaon Dabhade Ganeshotsav: तळेगाव दाभाडेचा गणेशोत्सव डीजेमुक्त होणार?; पोलिस उपायुक्त श्वेता खेडकरांचे मंडळांना आवाहन

ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेचा वापर स्वेच्छेने टाळा; मिरवणुकीत वाहतुकीला अडथळा न आणता नियमांचे पालन करण्याच्या सूचना

पुढारी वृत्तसेवा

तळेगाव दाभाडे: यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, आनंदात आणि शांततेत साजरा करताना ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी गणेशोत्सव डीजेमुक्त करण्याचे आवाहन परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी केले आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त्यांनी गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी व उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीत पोलिस उपायुक्त प्रिया डमाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर पाटील, नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलिस निरीक्षक प्रवीण कांबळे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश लोंढे, महावितरणचे निखिल कुंदुलवार, गणेश देवगडकर, प्राथमिक आरोग्य विभागाचे चौधरी यांसह महिला दक्षता समिती आणि शांतता कमिटीचे सदस्य, विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांरना त्रास होणारा नाही याची काळजी घ्या

गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा उत्सव आहे. त्यामुळे उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे खेडकर यांनी सांगितले. डीजे आणि ध्वनिक्षेपकांमुळे नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेता मंडळांनी स्वेच्छेने डीजेचा वापर टाळावा, असे आवाहन त्यांनी केले.

गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविण्यात येणार

नगर परिषदेकडून गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात येतील व मूर्तीदानाचे कार्यक्रम ठिकठिकाणी विविध संस्थांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येतील, अशी माहिती उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी दिली. तर, महावितरण विभाग, बीएसएनएल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र या सर्व विभागांकडून शक्य ती खबरदारी व उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

वाहतुकीला अडथळा होऊ देवू नका

गणेशोत्सव मंडळांनी प्रशासन व पोलिसांना सहकार्य करून उत्सव शांततेत पार पाडावा. मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही. तसेच, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जावे, याबाबतही बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. मंडळांनी शासन व पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असेही स्पष्ट करण्यात आले. या वेळी उपस्थित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून गणेशोत्सव शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याची भूमिका व्यक्त केली.

सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य द्या

डीजेच्या दणदणाटापेक्षा पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देत भक्तिमय आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव तळेगाव दाभाडे शहरात शांतता, सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा राखत डीजेमुक्त पद्धतीने साजरा होणार का?, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT