पिंपरी: घरात योगेश बहल यांच्या तीन कार्यकर्त्यांनी घुसून धिंगाणा घातल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक 20 च्या भाजपच्या उमेदवार सुजाता पालांडे यांनी केला. पालांडे यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना करूनही पोलिस गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत पालांडे यांच्यासह आमदार उमा खापरे, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन केले.
पालांडे यांच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी (15 जानेवारी) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांच्या घरात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाचा एक माणूस आणि योगेश बहल यांच्या नात्यातील तीन व्यक्ती घुसल्या. त्या वेळी घरात केवळ पालांडे यांच्या आई होत्या. कार्यकर्त्यांनी बळजबरीने पालांडे यांच्या देव्हाऱ्यातील देव हलविले, तसचे आईवर हात उगारला. ही बाब कळताच पालांडे यांनी घरी धाव घेतली. त्या वेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पळून गेले. दरम्यान, भरारी पथकाच्या व्यक्तीला पकडून पलांडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात नेले. याबाबत राष्ट्रवादीचे योगेश बहल यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
पोलिस ठाण्यासमोर ठिय्या
सुजाता पालांडे यांच्या सोबत घडलेल्या या प्रकाराची माहिती कळताच भाजपच्या आमदार उमा खापरे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे आदी पदाधिकारी आणि शंभर पेक्षा जास्त कार्यकर्ते पोलिस ठाण्यासमोर दाखल झाले. पोलिस गुन्हा दाखल करून घेत नाहीत, मुख्यमंत्र्यांनी सूचना देऊनही गुन्हा दाखल होत नाही, असा आक्षेप घेत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
घरात संक्रांतीचे वाण आणि दारूच्या बाटल्या
मी काल महिलांना संक्रांतीनिमित्त महिलांना स्टीलचा डबा वाण म्हणून दिला. तसचे माझे पती व दोन मुले थोडीथोडी दारू पितात, त्यामुळे घरात दारूच्या 16 बाटल्या ठेवल्या होत्या, असे सुजाता पालांडे यांनी सोशल मीडियावर लाईव्हद्वारे सांगितले. त्यावरून आचारसंहितेत महिलांना वस्तू वाटप करणे, हा आचारसंहितेचा भंग नाही का ? अशी चर्चाही सुरू आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष योगेश बहल हा नीच माणूस आहे. त्याची गुंडगिरी किती दिवस सहन करायची. संत तुकारामनगरला लागलेली ही कीड आहे. त्यानेच हा प्रकार घडवून आणला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली नाही, तर मी आत्मदहन करणार आहे.सुजाता पालांडे, उमेदवार, भाजप
सुजाता पलांडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.सचिन हिरे, सहायक आयुक्त, पिंपरी- चिंचवड