

पिंपरी: महापालिका निवडणुकीच्या मतदानादिवशी शहरातील अनेक मतदान केंद्रांबाहेर एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले. उमेदवारांची संपत्ती, त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे आणि इतर वैयक्तिक तपशील छापील स्वरूपात फ्लेक्सवर लावण्यात आले होते. मतदारराजा हा फ्लेक्स थांबून, बारकाईने वाचत होते. काही ठिकाणी तर याच माहितीमुळे मतदारांचे मत बदलल्याचे स्पष्टपणे दिसून आले. ‘अरे बापरे! मी तर गुन्हेगारालाच मत देणार होतो’, अशी थेट आणि प्रामाणिक प्रतिक्रिया एका मतदाराने ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.
संबंधित मतदाराने सांगितले की, पक्षाचे नाव, ओळख आणि प्रचारातील मोठमोठ्या आश्वासनांवर विश्वास ठेवून मी मतदानाचा निर्णय घेतला होता. मात्र, फ्लेक्सवर उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि संपत्तीची माहिती वाचल्यानंतर माझे मन बदलले. मतदान केंद्रांच्या बाहेर उभ्या असलेल्या या फ्लेक्सभोवती अनेक मतदार चर्चा करताना दिसत होते. एवढी संपत्ती कशी जमली, इतके गुन्हे दाखल असताना हा उमेदवार लोकप्रतिनिधी कसा, असे प्रश्न नागरिक एकमेकांना विचारत होते. काही ठिकाणी कुटुंबातील सदस्य एकत्र उभे राहून माहिती वाचत होते आणि मतदानाचा निर्णय पुन्हा एकदा विचारपूर्वक घेत होते.
एका ज्येष्ठ मतदाराने सांगितले, आम्ही अनेक वर्षे मतदान करतोय, पण अशी थेट आणि स्पष्ट माहिती पहिल्यांदाच डोळ्यांसमोर आली. नाव ओळखीचे आहे म्हणून मत द्यायचे, ही सवय आज आम्ही सोडली. एका तरुण मतदाराने, सोशल मीडियावर खूप माहिती असते; परंतु मतदान केंद्रासमोरच अशी अधिकृत माहिती दिसल्यावर मत परावर्तित झाले, अशी प्रतिक्रिया दिली. उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी उघडपणे मांडल्याने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त केली जात होती.
प्रचारातील भावनिक भाषणांपेक्षा वस्तुनिष्ठ माहितीवर आधारित निर्णय घेण्याकडे मतदारांचा कल वाढत असल्याचे या निवडणुकीत ठळकपणे जाणवले. विशेष म्हणजे, काही मतदारांनी या फ्लेक्समुळे चूक टळली, असेही स्पष्टपणे कबूल केले. लोकशाहीतील मतदाराचा हा जागरूकपणा आशादायी मानला जात आहे. केवळ पक्षनिष्ठा किंवा ओळखीवर नव्हे, तर उमेदवाराचे चारित्र्य, पार्श्वभूमी आणि जबाबदारीच्या निकषांवर मतदान करण्याची ही सुरुवात असल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून आले. महापालिका निवडणुकीत उमेदवारांची माहिती उघडपणे मांडल्याने जाणकार मतदार घडताना दिसत असून, हीच सजगता भविष्यात स्वच्छ, पारदर्शक आणि जबाबदार राजकारणाची नवी दिशा ठरू शकते, अशी आशा राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.
उमेदवारांची माहिती देणारा फलक केला उलटा
प्रत्येक मतदान केंद्रांवर उमेदवारांचे शिक्षण, उत्पन्न, कर्ज, दाखल गुन्हे, झालेली शिक्षा अशी माहिती फलकावर प्रदर्शित करण्यात आली होती. मतदार तो फलक पाहून कोणत्या मतदारांना मतदान करायचे याचे निर्णय घेतात. काही उमेदवारांचे शिक्षण कमी व गुन्हे दाखल आहेत. अशा उमेदवारांच्या समर्थकांनी ते फलक उलटे करून लावले. त्यामुळे पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटी येथील केंद्राबाहेर दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. त्यानंतर तो फलक फाडण्याचा प्रयत्न झाला. अखेर, पोलिसांनी जमावाला शांत करत तो फलक केंद्राच्या प्रवेशद्वारावर दर्शनी भागात लावला. असे प्रकार अनेक मतदान केंद्रांच्या बाहेर घडले.