खराळवाडी: उन्हाळी सुट्ट्यांमुळे एप्रिल-मे महिन्यात गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. महागड्या खासगी लक्झरी बसपेक्षा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसला प्रवाशांची मोठी पसंती मिळत आहे. मात्र, ऑनलाईन रिझर्व्हेशनमुळे सामान्य प्रवाशांची मुस्कटदाबी होत आहे. एसटीमध्ये बसण्यासाठी जागा मिळाल्याचा सर्वसामान्य प्रवाशांना आनंद असतो. परंतु अचानक रिझर्व्हेशन केलेला प्रवासी येतो तेव्हा त्यांना नाइलाजास्तव उभा राहण्याची वेळ येत आहे. यामुळे सुखकर वाटणारा प्रवास वेदनादायक होत आहे.
मुलाना शाळेच्या सुट्या लागल्यामुळे उन्हाळ्यात अनेक जण आपल्या गावी किंवा फिरायला जातात. त्यासाठी रेल्वे तिकिटांची बुकींग तीन महिन्यांपूर्वी काही जणांनी करून ठेवलेली आहे. परंतु अनेकांना रेल्वे तिकीट मिळत नाही. त्यांना पर्याय मार्ग म्हणून खासगी प्रवासी वाहतुकीचा असतो तरी उन्हाळ्यात गर्दीचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स कंपनीने बसच्या तिकीटात मोठी वाढ केल्याने सर्वसामान्य प्रवाशांनी सध्या एसटी बसच्या प्रवासाला पसंती दिली आहे.
एसटी बसचे तिकीट सर्वसाधारण प्रवाशांना परवाडणारे असल्यामुळे सध्या एसटीच्या प्रवासासाठी वल्लभनगर बसस्थानकात प्रवासी गर्दी करताना दिसतात. उन्हाळ्याच्या सुट्टीचा फायदा घेऊन खासगी बसचे तिकीट दर जास्त आहे. उन्हाळ्यातील गर्दीमुळे खासगी बस वाहतुकीचे चांगले दिवस आले असून, सामान्य प्रवाशांच्या खिशाला मात्र झळ बसत आहे. राज्य परिवहन विभागाकडून यासंदर्भात काहीच पावले उचलली गेली नाहीत. राज्य परिवहन महामंडळाने ज्याप्रमाणे प्रवाशांना सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या त्याप्रमाणे खासगी ट्रॅव्हल्स बसने दिल्या नसल्यामुळे सध्या एसटी बसच्या रिझर्व्हेशनकडे प्रवाशांचा कल वाढला आहे.
प्रवाशांना विविध योजनांद्वारे मिळतेय सवलत
महाराष्ट्रात एसटी महामंडळामार्फत महिलांना 50 टक्के सवलत आणि 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास (अमृत ज्येष्ठ नागरिक योजना) दिली जाते. 60 ते 75 वयोगटातील ज्येष्ठांना 50 टक्के सवलत मिळते. स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या एका जोडीदाराला एसटी बसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध आहे. एसटी बसेसमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना प्रवासासाठी सवलत दिली जाते. एसटी बसमधील दिव्यांगाना 40 ते 100 टक्के दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींना साध्या आणि निम-आराम बसमध्ये 75 टक्के सवलत मिळते. दिव्यांग व्यक्तीसोबत प्रवास करणाऱ्या मदतनिसास 50 टक्के सवलत दिली जाते.
प्रत्येक बसमध्ये रिझर्व्हेशन असल्याने वाहक बसमध्ये चढताना प्रवासी ऑनलाईन बुकिंगचे बसणार आहेत. त्यामुळे बसायला जागा नाही, असे सांगून खाली उतरून देतात. त्यामुळे नाहक त्रासाला कंटाळून जाण्याची वेळ येते. तरी एसटी महामंडळाने प्रवाशांचा विचार करून काही सीट सामान्य प्रवाशांसाठी खुले ठेवले पाहिजे.भगवान चाबुकस्वार, ज्येष्ठ प्रवासी
सर्वसामान्य प्रवाशांना प्रवासाचा फायदा मिळावा याचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाने दिव्याग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आसन व्यवस्था केली आहे. प्रवाशांनी सुरळीत प्रवास करावा.वैशाली कांबळे, बसस्थानक प्रमुख, वल्लभनगर
ज्येष्ठ नागरिकांचा अपंगांचा कोटा ठरलेला असतो, त्यानुसार त्यांना जागा शिल्लक ठेवलेली असते. जर बसमध्ये रिझर्व्हेशनमुळे गर्दी असल्यास पुढच्या दुसऱ्या बसमध्ये त्यांना पाठवले जाते. तरी घरी बसून प्रवाशांनी ऑनलाईन बुकिंगचा जास्तीत जास्त फायदा घेऊन रिझर्व्हेशन करावे.पल्लवी पाटील, आगार व्यवस्थापक, रा. प. पिंपरी-चिंचवड