

पिंपरी: मावळ तालुक्यातील कातवी येथील व्हीटीपी अर्बन लाईफ सोसायटीमध्ये आठव्या मजल्यावरून पडून एका 34 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 9) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. प्रतिभा मनीष शंकर (रा. व्हीटीपी अर्बन लाईफ सोसायटी, कातवी, मावळ) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा शंकर या दुपारच्या सुमारास त्यांच्या घराच्या बाल्कनीत आठव्या मजल्यावर लटकलेल्या अवस्थेत सोसायटीतील नागरिकांना दिसल्या. त्या काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत गॅलरीतून त्यांना हात देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हात निसटल्याने त्या खाली पडल्या.
या घटनेत प्रतिभा शंकर यांचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहेत.