वाढत्या मजुरीत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले Pudhari
पिंपरी चिंचवड

Soybean Harvest Labor Shortage: वाढत्या मजुरीत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले; नवलाख उंबरे परिसरात सोयाबीन काढणीला मजूर मिळेना

मजुरांची टंचाई आणि वाढती दरवाढीमुळे शेतकऱ्यांना काढणीची कामे वेळेत पूर्ण करणे अवघड

पुढारी वृत्तसेवा

महेश भागीवंत

नवलाख उंबरे : ग्रामीण भागात सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असून, सर्वत्र शेतकऱ्यांची लगबग दिसत आहे. मात्र, या उत्साहावर पाणी फिरवले आहे ते मजुरांच्या टंचाईने. दिवाळीपूर्वी शेतीची सर्व कामे आटोपून घेतली जावीत, यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरू आहे; परंतु वाढती मजुरी आणि मजुरांची अनुपलब्धता यामुळे अनेक शेतकऱ्यांना काढणीची कामे वेळेत पार पाडणे अवघड झाले आहे.(Latest Pimpri chinchwad News)

जेवणाचीही करावी लागते सोय

सध्या सोयाबीन काढणीसाठी मजुरी 400 ते 500 रुपये प्रतिदिन इतकी वाढली असली, तरी मजूर मिळणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांकडे मजुरांसाठी वाहने करून आणणे, राहण्याची व्यवस्था करणे आणि जेवण देणेही भाग पडत आहे. तरीही मजूर कमी पडत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढत आहे. अतिवृष्टीने आधीच पिकांचे नुकसान झालेले असताना आता उरलेले थोडेसे पीक काढण्यासाठीदेखील शेतकऱ्यांना आता मजुरांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. पिकांची वाढलेली काढणीची मुदत, पावसाचा पुनःप्रवेश आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढली आहे.

काही शेतकऱ्यांचा यांत्रिक शेतीवर भर

शेतकऱ्यांना केवळ सोयाबीनच नव्हे, तर मका, तूर, आणि भाजीपाला पिकांच्या काढणीसाठीही मजूर मिळणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी शेतकरी स्वतःच कुटुंबाच्या सदस्यांसह काढणीचे काम करताना दिसत आहेत. शेतीकामासाठी यंत्रसामग्रीचा वापर वाढविण्याची मागणीदेखील वाढली आहे, परंतु सर्व शेतकऱ्यांकडे यंत्र खरेदीची आर्थिक क्षमता नसल्याने त्यांचे मजुरांवर अवलंबित्व कायम राहते. स्थानिक कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले, की शेतकऱ्यांनी एकत्र येऊन मजूर गट तयार करावेत. तसेच, यंत्रसामग्री सहकार पद्धतीने वापरावी म्हणजे खर्च कमी होईल. सरकारही शेतकऱ्यांना काढणी यंत्रे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यासाठी योजना आणत आहे.

ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या मेहनतीला न्याय मिळावा, त्यांचे नुकसान टाळावे आणि मजुरांना स्थिर रोजगार मिळावा यासाठी शेतकरी व मजूर दोघांनाही आधार देणारी धोरणात्मक पावले सरकारने उचलण्याची मागणी केली जात आहे.

शेतीमधील मेहनतीच्या कामांसाठी मजूरवर्ग कमी होत चालला आहे. बांधकाम, औद्योगिक क्षेत्र, मनरेगा यांसारख्या पर्यायी रोजगारांकडे मजूर वळले आहेत. त्यामुळे शेतीत काम करणारे हात घटले आहेत आणि काढणीसाठी मनुष्यबळ मिळवणे मोठी समस्या बनली आहे. सरकारने शेतमजुरांसाठी स्थिर धोरण आखले नाही, तर पुढील काही वर्षांत शेतीकामासाठी मजूर पूर्णपणे गायब होतील.
नाना ढोरे, शेतकरी
सध्या सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. तीनशे ते चारशे रुपये दररोज घरखर्च भागवायला अपुरे पडतात. शिवाय सोयाबीन काढणी हे फार जिकरीचे काम आहे. त्यामुळे रोजंदारी वाढवावी लागली आहे. काहीजण आता बांधकाम वा औद्योगिक ठिकाणी काम करणे पसंत करतात. कारण तिथे नियमित पगार आणि अन्य सुविधा मिळतात.
कौसाबाई खुडे, महिला मजूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT