पिंपरी: शिक्षकांना एसआयआर अर्ज भरण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. सुट्यांच्या दिवशीही कामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे शाळेत शिकवायचे की, फॉर्म भरण्याची कामे करायची, असा पेच शहरातील अनेक शाळांतील शिक्षकांसमोर उभा ठाकला आहे. तसेच, एसआयआरच्या कामात शिक्षक व्यग्र झाल्याने इयत्ता १ ते १० वर्गांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष मतदार यादी सुधारणा (एसआयआर) मोहीम राबविली जात आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार मतदार याद्या अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविली जात आहे. या प्रक्रियेदरम्यान नव्या मतदारांची नोंदणी, मत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच मतदारांच्या तपशीलातील दुरुस्त्या करण्यात येणार आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका, अनुदानित, विनाअनुदानित खासगी शाळांतील शिक्षकांनी हे एसआयआर अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. या कामासाठी शिक्षकांना शहरातील परिसरानुसार कामाचे वाटप केले आहे. शिक्षकांनी नेमलेल्या परिसरात घरोघरी जाऊन एसआयआर अर्ज भरून घ्यायचे आहेत. शहरातील शिक्षक या कामांमध्ये गुतंले आहेत. २९ जुलैपर्यंत सर्व एसआयआर अर्ज भरण्याचे काम पूर्ण करायचे आहे.
विद्यार्थी शाळेत अन शिक्षक बाहेर
एसआयआरच्या कामामुळे शाळांमधील सर्व शिक्षक थंम्ब करून बाहेर पडतात. मुले शाळेत येऊन वर्गात तर बसतात; पण शिकवायला आणि शिस्त राखायला शिक्षकच नाहीत. शाळांमध्ये मानधनावरील शिक्षक आणि प्रभारी मुख्याध्यापक हेच शाळांचा गाडा हाकताना दिसत आहेत. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच एसआयआरमुळे नियमित अध्यापनावर परिणाम होत आहे. यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकांसाठीदेखील शिक्षकांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती.
सर्व वर्ग एकत्र करून अध्यापन
वर्गावर शिक्षक नसल्याने मानधनावरील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सर्व वर्गांना एकत्र बसवून शिकवावे लागत आहे. अशा वेळी एकाच वर्गात विद्यार्थ्यांना दाटीवाटीने बसविले जाते. शाळेत शिक्षक नसल्यामुळे वर्गावर विद्यार्थ्यांची भांडणे होतात. एकाचवेळी सर्व विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे अवघड जात आहे.
पाल्याला अभ्यासातले काहीच येत नाही
शाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी आमच्या पाल्याला काहीच येत नाही. थोडीदेखील प्रगती त्याच्यामध्ये झालेली नाही. कारण मुले शाळेत येतात आणि शिकवायला शिक्षकच नाहीत. दररोज शाळेत बसतात आणि शाळा सुटल्यावर घरी येतात, असे एका पालकाने सांगितले.
पालिकेच्या शाळांमधील जवळपास ९० टक्के शिक्षक एसआयआरच्या कामामध्ये गुंतले आहेत. शाळांमध्ये फक्त मानधनावरील शिक्षक आणि मुख्याध्यापकच विद्यार्थ्यांना शिकवित आहेत.संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, मनपा