Shravan Sari Pudhari
पिंपरी चिंचवड

Shravan Sari 2026: पिंपरीत रंगणार ‘श्रावण सरी’; मंगळागौर, कलाकारांशी गप्पा अन् ‘श्रावण क्वीन’ची रंगत

‘पुढारी’ कस्तुरी क्लब आणि ‘सन मराठी’चा विशेष सोहळा ८ सप्टेंबरला; लकी ड्रॉ, आकर्षक भेटवस्तू आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: श्रावणातील मंगळागौर, सन मराठी वाहिनीवरील मालिकांमधील प्रसिद्ध कलाकारांशी संवादाची संधी, मनोरंजक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम, लकी ड्रॉ अन्‌ आकर्षक भेटवस्तू, अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांचा आनंद घेण्याची संधी महिलांना श्रावण सरी या कार्यक्रमात मिळणार आहे. दैनिक ‘पुढारी’ कस्तुरी क्लब आणि ‘सन मराठी’च्या वतीने मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) हा कार्यक्रम दुपारी अडीच वाजता पिंपरी येथील गांधीनगर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील सावित्रीबाई फुले स्मारक येथे रंगणार आहे. श्रावणानिमित्त खास महिलांसाठी आयोजित केलेली ‘कस्तुरी श्रावण क्वीन’ स्पर्धा हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. ‘श्रावण सरी’ हा सोहळा महिलांसाठी आनंद, उत्साह आणि मनोरंजनाची अनोखी पर्वणी ठरणार आहे.

‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने नेहमीच महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून ‘श्रावण सरी’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. पारंपरिक मंगळागौर सादरीकरण हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण राहणार आहे. संगीत, नृत्य, खेळ आणि हास्यविनोदाने सोहळ्याला रंगत येणार आहे. तसेच, या कार्यक्रमाला आणखी रंगत येणार आहे ते ‘सन मराठी’ वाहिनीवरील कलाकारांच्या उपस्थितीने. ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘मी संसार माझा रेखिते’ या लोकप्रिय मालिकेतील हरिश दुधाडे (अविनाश), आशा बोडस (पिहू) यांच्यासह ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेतील योगिता चव्हाण (अर्पिता) आणि अंबर गणपुले (समीर) या कलाकारांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

महिलांना कलाकारांशी संवादाची संधी मिळणार असून, छायाचित्रही काढता येणार आहे. लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहचलेले हे कलाकार प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होणार असल्याने कस्तुरी सदस्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. इतकेच नव्हे, तर महिलांसाठी ‘पुढारी कस्तुरी श्रावण क्वीन २०२६’ ही स्पर्धाही होणार आहे. सौंदर्याबरोबरच बुद्धिमत्ता, आत्मविश्वास, संस्कृती आणि व्यक्तिमत्त्वाचा सुरेख संगम या स्पर्धेत पाहायला मिळणार आहे. महिलांसाठी विविध मनोरंजक खेळ, उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीही असणार आहे. महिलांच्या दैनंदिन धावपळीतून काही क्षण स्वतःसाठी मिळावेत, मैत्रिणींसोबत आनंदाचे क्षण अनुभवता यावेत आणि आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे. महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

सहभागी होण्यासाठी इथे करावा संपर्क :

‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे आयोजित या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी ८८८८८०८०२७ आणि ८६००४०२३२३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात असणार बक्षिसांची लयलूट

‘श्रावण सरी’ कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांसाठी लकी ड्रॉचेही आयोजन केले आहे. उपस्थितांमधून पाच भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार असून, त्यांना विशेष बक्षिसे दिली जाणार आहेत. विशेष म्हणजे, कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक कस्तुरी सदस्यासाठी आयोजकांकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. या विशेष कार्यक्रमासाठी डॉ. रवींद्र बर्वे यांचे एस्ट्रोहब आणि सोन सखी हे गिफ्ट पार्टनर आहेत. कार्यक्रमाला प्रत्येक महिलेला सोन सखी यांच्यातर्फे कानातले भेट मिळणार आहेत.

  • कार्यक्रम कधी : मंगळवारी, दि. ८ सप्टेंबर २०२६

  • कुठे : सावित्रीबाई फुले स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधीनगर, पिंपरी

  • वेळ : दुपारी २.३० ते सायंकाळी ६.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT