पिंपरी : पुनावळे येथील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेसाठी आरक्षित जागा तुटपुंज्या रकमेवर खासगी संस्थेला देण्याचा घाट घातला जात आहे. त्या आरक्षित जागेवर महापालिकेने गोरगरीब मुलांसाठी शाळा सुरू करावी. या शाळेचे आरक्षण खासगी संस्थेला देणे म्हणजे महापालिकेचे खासगीकरण करण्याचा प्रकार आहे. हा ठराव आयुक्तांनी मंजूर करू नये. महापालिकेचे खासगीकरण थांबवावे. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पक्षाचे शहरप्रमुख चेतन पवार यांनी शुक्रवारी (दि. 12) पत्रकार परिषदेत दिला आहे.
या वेळी उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, शहर समन्वयक कैलास नेवासकर, कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका अनिता तुतारे, वैशाली काटकर, वैशाली कुलथे, अमोल निकम, पार्थ गुरव, दिलीप सावंत, श्रीमंत गिरी, विशाल चव्हाण, योगेश राऊत, उज्वला सावंत, तस्लीम शेख, कलावती नाटेकर, बेबी सय्यद, पूनम रिठे, वंदना खंडागळे आदी उपस्थित होते.
प्रती चौरस फूट 3 रुपये 60 पैसे भाडे
चेतन पवार म्हणाले, की पुनावळेतील शाळेसाठी आरक्षित 91 गुंठे जागा ईस्ट ऑक्सफर्ड इंटरनॅशनल फाउंडेशनला भाडे कराराने देऊ नये. भूमी आणि जिंदगी कार्यालयाकडून त्यासाठी केवळ प्रती चौरस फूट 3 रुपये 60 पैसे भाडे निश्चित करण्यात आले आहे. हा सर्व प्रकार संशयास्पद असून, नक्की कोणत्या आधारे हा दर ठरविण्यात आला हे स्पष्ट करावे. तेथे महापालिकेने गोरगरिबांच्या मुलांसाठी चांगल्या दर्जेदार स्वरूपाची शाळा उभारावी.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया न करता तेट एका खासगी संस्थेला काम देण्यात आले आहे. गणवेशाची रक्कम वाढवली आहे. तो ठराव रद्द करून, नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. ताथवडे येथील जिल्हा परिषदेची शाळा महापालिकेकडून सन 2013 ला हस्तांतरीत झाली आहे. मात्र, अद्याप ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नाही. शिक्षण विभागाच्या या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पवना नदीत थेट सांडपाणी
शहरात पाणीपुरवठा करणार्या पवना नदीची दुरवस्था झाली आहे. पवना नदीत राडारोडा टाकून नदीपात्र छोटे करण्याचे काम बिनदास्तपणे चालू आहे. काही ठिकाणी थेट ड्रेनेजलाईनद्वारे मैलासांडपाणी नदी पात्रात सोडले जात आहे. त्याबाबत महापालिका प्रशासन कोणतही ठोस कारवाई करत नाही. तसेच, ताथवडे येथील सर्वे नं 64/2/1 मधील जागेच्या नकाशात नाला दाखवण्यात आला आहे. मात्र, बांधकाम परवानगा देताना तेथील नाला सी आकारात शिफ्ट करण्यात आला आहे, असा आरोप चेतन पवार यांनी केला आहे.