

पिंपळे गुरव: विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भवितव्य धोक्यात आणणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात सांगवी पोलिसांनी आता कंबर कसली आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात सुरू असलेल्या पान, गुटखा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली असून, पिंपळे गुरव परिसरातील विविध शाळांच्या १०० मीटर परिघातील पानटपऱ्या व दुकानांना कायदेशीर नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.
शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कठोर भूमिका घेत सांगवी पोलिसांनी संबंधित दुकानदारांना नियमांचे पालन करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून, अनेकांनी तत्काळ अशा पदार्थांची विक्री बंद करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे.
टप्प्याटप्प्याने होणार कारवाई
सांगवी पोलिसांनी कारवाईसाठी टप्प्याटप्प्याने कार्यपद्धती निश्चित केली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या नोटीसद्वारे दुकानदारांना शाळा परिसरात गुटखा, पानमसाला, सिगारेट व
तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याची सक्त ताकीद दिली आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन सुरू राहिल्यास संबंधित दुकान चालकाविरोधात COTPA कायद्यानुसार खटला दाखल करून न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
काय सांगतो COTPA कायदा ?
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ अधिनियम (COTPA) २००३ नुसार कोणत्याही शाळा, महाविद्यालय किंवा शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी आहे. तसेच शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशद्वारावर "१०० मीटर परिसरात तंबाखू विक्रीस मनाई आहे" असा फलक लावणे बंधनकारक आहे. अल्पवयीन विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा मानला जातो. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाईची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे.
पालक, नागरिकांकडून कारवाईचे स्वागत
सांगवी पोलिसांच्या या धडक मोहिमेचे स्थानिक नागरिक, पालक आणि शिक्षकांकडून स्वागत करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी अशा कारवाया सातत्याने होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या गोष्टी
• शाळा परिसरातील तंबाखू विक्रीविरोधात पोलिसांची धडक मोहीम
• १०० मीटर नियमाचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई
• नोटीसनंतरही नियमभंग सुरू ठेवल्यास COTPA अंतर्गत न्यायालयीन खटला
शाळांच्या परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांमुळे विद्यार्थ्यांवर चुकीचे परिणाम होण्याची भीती असते. पोलिसांनी सुरू केलेली ही मोहीम अत्यंत स्तुत्य असून शाळा परिसर पूर्णपणे व्यसनमुक्त होईपर्यंत अशीच तपासणी आणि कारवाई सुरू ठेवावी.
- पालक.
शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी सांगवी पोलिस ठाण्याच्या दामिनी पथक आणि मार्शल यांच्या वतीने पान टपरी, सिगारेट, गुटखा विक्रेते यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. COTPA कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरात गुटखा, पानमसाला, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास बंदी आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर COTPA अंतर्गत खटले भरणार आहोत.
- जितेंद्र कोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस