Cyber Fraud: दुबई-बँकॉकमधून सायबर रॅकेट चालवणारा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार जेरबंद

रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे थायलंडमधून भारतात आणले
Cyber Fraud
Cyber FraudPudhari
Published on
Updated on

पिंपरी: दुबई आणि थायलंडमधून भारतातील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची सायबर फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी टोळीच्या मुख्य सूत्रधाराला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी अखेर जेरबंद केले. इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीस आणि लुक आऊट सर्क्युलरच्या (एलओसी) आधारे थायलंडमधील बँकॉक विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या कामगिरीचे राज्य स्तरावर कौतुक केले जात आहे.

सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा देहूरोड आणि हिंजवडी पोलिस ठाणे येथे दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग निष्पन्न झाला. या गुन्ह्यांमध्ये टास्क फ्रॉड, शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक आणि कोट्यवधी रुपयांच्या ऑनलाइन आर्थिक गुन्ह्यांचा समावेश आहे.

Cyber Fraud
Postal Letter Boxes: शहरातील टपालपेटी धूळ खात; पत्रांची वाट पाहणाऱ्या टपाल पेट्यांवर चढला गंज

देहूरोड पोलिस ठाण्यातील गुन्ह्याचा तपास सुरू असताना सायबर पोलिसांनी जून २०२४ मध्ये १३ आरोपींना अटक केली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर या संपूर्ण रॅकेटचा सूत्रधार सौरभ उर्फ गणेश काळे असल्याचे समोर आले. आरोपी दीपक गाडे हा दुबई येथे जाऊन गणेश काळेला भेटला होता. भारतातील विविध बँक खात्यांची माहिती, एटीएम कार्ड, चेकबुक, इंटरनेट बँकिंग आयडी आणि पासवर्ड आरोपीला पुरवले जात असल्याचे उघड झाले. त्याबदल्यात संबंधितांना मोबदला दिला जात होता.तपासात आरोपीने दुबईमध्ये सायबर फसवणुकीचे मुख्य कार्यालय उभारल्याचेही निष्पन्न झाले.

सायबर पोलिसांचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी यांनी केलेल्या तांत्रिक तपासात आरोपी भारतातील विविध व्यक्तींकडून बँक खाती मिळवून त्यांचा वापर सायबर गुन्ह्यांमधून आलेला पैसा स्वीकारण्यासाठी आणि वळवण्यासाठी करत असल्याचे आढळून आले. तसेच आरोपी चीनसह इतर परदेशी नागरिकांच्या संपर्कात होता. त्यांच्या मदतीने टास्क फ्रॉड, शेअर मार्केट गुंतवणूक फसवणूक, डिजिटल अरेस्टसारख्या क्लृप्त्या वापरून भारतीय नागरिकांना गंडा घातला जात होता.

Cyber Fraud
Tobacco Sales Near Schools: शाळांभोवतीच्या गुटखा विक्रेत्यांवर कारवाई

दरम्यान, आरोपीविरुद्ध उपलब्ध पुराव्यांच्या आधारे महाराष्ट्र शासनामार्फत केंद्रीय गृह मंत्रालयाकडे प्रत्यार्पणाचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यावर दुबईतील भारतीय दूतावासामार्फत कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. मात्र, सप्टेंबर २०२५ मध्ये आरोपी दुबई सोडून बँकॉक येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून आरोपीविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस आणि लुक आऊट सर्क्युलर जारी करून घेतले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या समन्वयातून आरोपी थायलंडमधून अन्य देशात पळून जाण्याच्या तयारीत असताना बँकॉक विमानतळावर स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी त्याला ताब्यात घेतले.

आरोपीला भारतात आणल्यानंतर ११ जून रोजी मुंबई विमानतळावर सायबर पोलिसांचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलिस हवालदार हेमंत खरात आणि पोलिस शिपाई नितेश बिचेवार यांच्या पथकाने त्याचा ताबा घेतला. त्यानंतर देहूरोड पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपीचा मुंबईतील नोडल सायबर पोलिस ठाणे, मालवणी पोलिस ठाणे तसेच तेलंगणातील सायबराबाद पोलिस ठाण्यातील अनेक सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांशी संबंध असल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे देशभरातील अनेक आर्थिक सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे करीत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news