Sewage Water Pudhari
पिंपरी चिंचवड

Pavana River Pollution: पवना नदीत रासायनिक सांडपाणी; चार कंपन्यांना २.५८ कोटींचा दंड

शिरगाव परिसरातील नाल्यात प्रक्रिया न केलेले सांडपाणी व लिचेट सोडल्याचे उघड; एमपीसीबीच्या कारवाईची एनजीटीतील प्रतिज्ञापत्रातून माहिती

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी : मावळ तालुक्यातील शिरगाव परिसरातील काही औद्योगिक कंपन्यांचे रासायनिक सांडपाणी आणि लिचेट (कचर्‍यातून निर्माण होणारा विषारी द्रव) प्रक्रिया न करता थेट नााल्यात सोडले जात होते. नाल्याद्वारे ते सांडपाणी पवना नदीत मिसळत होते. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) दोषी कंपन्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

या प्रकरणात चार कंपन्यांना एकूण दोन कोटी 58 लाख 17 हजार 500 रुपयांची पर्यावरणीय नुकसान भरपाईनुसार दंड निश्चित करण्यात आला आहे. राष्ट्रीय हरित लवादात (एनजीटी) प्रदूषण मंडळाने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही बाब समोर आली.

गंगा पेपर्स इंडिया लिमिटेड, रायझिंग प्रॉपकॉन एलएलपी, मेन्ट्रो अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्स आणि कराग्या फूड्स या कंपन्यांवर नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली आहे. नियम उल्लंघनाचा कालावधी आणि उद्योगांची श्रेणी विचारात घेऊन दंडाची ही रक्कम निश्चित केली आहे. मेन्ट्रो अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्सच्या पाहणीत रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र (ईटीपी व एसटीपी) बंद असल्याचे आढळले आहे. भुसा व बॉयलर धुरातून निर्माण होणारे प्रक्रिया न केलेले सांडपाणी आवाराबाहेर सोडले जात होते. त्यातून निर्माण होणारे लिचेट जवळच्या नाल्यातून पवना नदीला मिळत असल्याचे अहवालात नमूद आहे.

गंगा पेपर्स येथील ईटीपीमधील लिचेट नाल्यात सोडले जात होते. तसेच कागदी कचरा व मैलायुक्त गाळ (स्लज) उघड्यावर साठविल्याचे आढळले. कामगार आणि पॉवर प्लांटमधील सांडपाणीही नाल्यामार्फत पवना नदीपर्यंत पोहोचत असल्याचे नोंदवण्यात आले आहे. रायझिंग प्रॉपकॉनच्या मागील नाल्यातही हा विसर्ग आढळला. नाल्यालगत कचरा आणि बांधकामाचा राडारोडा टाकल्याचे प्रदूषण मंडळाने आपल्या अहवालात नमूद केले आहे.

प्रदूषण मंडळाने केलेला दंड

  • कंपनीचे नाव : दंडाची रक्कम

  • गंगा पेपर्स : 1 कोटी 71 लाख रुपये

  • रायझिंग प्रॉपकॉन : 62 लाख 62 हजार रुपये

  • मेन्ट्रो अ‍ॅग्रो : 20 लाख 75 हजार रुपये

  • कराग्या फूड्स : 3 लाख 50 हजार रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT