Sanitary Pad Pudhari
पिंपरी चिंचवड

Sanitary Pad Disposal Issue: पिंपरीत सॅनिटरी पॅड विल्हेवाटीचा मोठा प्रश्न; कचरावेचकांना धोका

पिंपरीत सॅनिटरी पॅडच्या सुरक्षित विल्हेवाटीची यंत्रणा नसल्याने कचरावेचकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे समोर आले; रेड डॉट मोहिमेची मागणी

पुढारी वृत्तसेवा

वर्षा कांबळे

पिंपरी: मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी सॅनिटरी पॅड वापरण्यास उद्युक्त केले जाते. सॅनिटरी पॅडच्या वापरामुळे मासिक पाळीतील स्वच्छतेचा प्रश्न मिटला असला तरी मात्र, त्याच्या विल्हेवाटीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सॅनिटरी पॅडचा वापर वाढला, पण त्याचे सुरक्षित डिस्पोजल करणारी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे कचरावेचकांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे.

विल्हेवाट करण्याची सोय नाही

मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जनजागृती होण्यासाठी, तसेच या कालावधीत स्वच्छतेची काळजी कशाप्रकारे घ्यावी, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून 28 मे हा दिवस मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्या चार दिवसांमध्ये महिलांना आपले घर सोडून बाहेर कुठेही गेले की सॅनिटरी पॅड टाकण्यासाठी सुविधा नसतील, तर ते त्यांच्यासाठी फार गैरसोयीचे होते. हल्ली सर्रास महिला व मुली यांना पॅड वापरणे सोयीचे वाटते; परंतु त्याची विल्हेवाट कशी लावावी? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो.

महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी पॅड वेडिंग मशीनचा अभाव

विशेषत: ग््राामीण भागातील महिलांसाठी सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावणे कठीण जाते. याबाबतीत संशोधन होऊन सहज याची विल्हेवाट कशी लावता येतील, असे सॅनिटरी पॅड तयार करणे ही आव्हानात्मक बाब आहे. महाविद्यालय व हॉस्टेलमध्ये सॅनिटरी पॅड वेडिंग मशीनचा वापर होत नसल्याचे दिसत आहे. महाविद्यालयांमध्ये सॅनिटरी पॅड वेडिंग मशीन लावणे बंधनकारक केले असताना अनेक महाविद्यालयांमध्ये ही मशीनच लावलेली नसते. जरी असली तरी तिचा वापर होत नाही, असे चित्र आहे. कारण एक सॅनिटरी पॅड डिस्पोजल व्हायला दहा मिनिटांचा कालावधी लागतो. कारण या मशीनमध्ये असलेली कॉईल लवकर तापत नाही.

वर्गीकरणासाठी हवी रेड डॉट मोहीम

स्वच्छ संस्थेच्यामार्फत शहरातील सॅनिटर पॅडचे सुरक्षित संकलन आणि विल्हेवाटीसाठी रेड डॉट मोहीम सुरू करण्यात आली आहे. सॅनिटरी पॅड कशातही गुडांळून न टाकता ती ओळखण्यासाठी एका पिशवी किंवा पेपरमध्ये पॅक करून त्यावर रेड डॉट लावून द्यावा, असे आवाहन करण्यात येते. त्यामुळे सॅनिटरी पॅडचा कचरा वेगळा करणे सोपे होते. मात्र, ही मोहीम शहरात राबविली जात नसल्याचे दिसत आहे.

सुक्या कचऱ्यात सॅनिटरी कचरा

शहरात सर्वच ठिकाणी घंटागाडीच्या माध्यमातून कचऱ्याचे संकलन होते. या घंटागाडीला खालच्या बाजूस एक सॅनिटरी बॉक्स देण्यात आला आहे. याठिकाणी सॅनिटरी कचरा वेगळा दिल्यास कचरा वेचकांकडून तो या बॉक्समध्ये वेगळा ठेवला जातो. मात्र, घरातून येणाऱ्या कचऱ्याचे फक्त ओला आणि सुका असे वर्गीकरण करून देण्यात येते. सॅनिटरी कचरा हा नेहमी सुक्या कचऱ्यात एकत्र दिला जातो.

आम्ही जेव्हा कचऱ्यातील कागदाचे पुनर्वापरासाठी वर्गीकरण करतो, तेव्हा कधी कागदामधून सॅनिटरी पॅड हाताळले जाते. तेव्हा तो आमच्यासाठी फार विचित्र अनुभव असतो. आमच्याबरोबर काम करणारे पुरुषही असतात. त्यांनादेखील वर्गीकरण करताना हा अनुभव येतो. त्यामुळे महिलांनी नेहमी सॅनिटरी पॅड टाकताना रेड डॉट लावावा. जेणेकरून आधीच आम्हाला याची कल्पना येईल. मी स्वत: रेड डॉट पेपर बॅग करून घराघरात देते.
अनुराधा गायकवाड, कचरावेचक प्रतिनिधी, स्वच्छ संस्था
कचरावेचक दररोज तीन टन सॅनिटरी कचरा वेगळा संकलित करतात. सॅनिटरी कचरा इतर सुक्या कचऱ्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीत लपवून देण्यापेक्षा कागदात गुंडाळून रेड डॉट लावूनच वेगळा द्यायला हवा. या एका सवयीमुळे कचरा वेचकांच्या आरोग्यास होणारा मोठा धोका टळू शकतो. या कचऱ्याचा पुनर्वापर करणे शक्य होत आहे. मासिक पाळीदरम्यान स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी वापरलेले सॅनिटरी पॅड कचऱ्यात टाकताना दुसऱ्याच्या आरोग्यास धोका ठरणार नाही, याची काळजी घ्यावी.
लुबना अनंतकृष्णन, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्वच्छ संस्था

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT