Pregnancy Pudhari
पिंपरी चिंचवड

High Risk Pregnancy Screening: सांगवीत पीएमएसएमए शिबिरातून १७५ ‘हाय-रिस्क’ मातांचा शोध

वेळेवर तपासणीमुळे गरोदर मातांच्या आरोग्याला मोठा दिलासा; विशेष ट्रॅकिंगद्वारे सुरक्षित प्रसूतीची तयारी

पुढारी वृत्तसेवा

सांगवी: गरोदरपणात उद्भवणारी गुंतागुंत आणि 'हाय-रिस्क' स्थिती ही मातेच्या आणि बाळाच्या आयुष्यासाठी मोठी जोखीम असते. मात्र, सांगवी जिल्हा रुग्णालयाने नुकत्याच राबवलेल्या विशेष मोहिमेत या जोखमीच्या मातांचा वेळेत शोध घेऊन एक मोठी आरोग्य आपत्ती टाळली आहे. 'प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियाना'च्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिबिरात १७५ माता 'हाय-रिस्क' असल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर आता विशेष उपचारांचे कवच तयार केले आहे.

या आरोग्य तपासणी शिबिरात एकूण ६८४ मातांनी सहभाग नोंदवला. तपासणी दरम्यान आढळून आलेली १७५ 'हाय-रिस्क' मातांची संख्या ही आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेचे फलित आहे. रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, उच्च रक्तदाब यांसारख्या प्राथमिक चाचण्यांपासून ते कावीळ, एचआयव्ही आणि सिफिलीसपर्यंतच्या गंभीर चाचण्यांपर्यंत सर्व तपासण्या एकाच ठिकाणी करण्यात आल्या. यामध्ये ४ मातांमध्ये उच्च रक्तदाब आणि ३ माता कावीळ बाधित असल्याचे आढळले. जर या मातांची तपासणी झाली नसती, तर प्रसूतीच्या वेळी गंभीर परिस्थिती उद्भवली असती. मात्र, या शिबिरामुळे त्यांना आता योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

​तज्ज्ञांचे नियोजन, मातांना आधार

जिल्हा शल्यचिकित्सक नागनाथ यमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ऋता मुळे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना जोशी यांच्या पथकाने केवळ चाचण्या केल्या नाहीत, तर या १७५ मातांना 'स्पेशल ट्रॅकिंग' खाली घेतले आहे. प्रसूतीपूर्व तपासणीसाठी दर महिन्याच्या ९, १८ आणि २७ या तारखा निश्चित करण्यात आल्या असून, प्रसूतीनंतर ४५ दिवसांपर्यंत या मातांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

आरोग्य यंत्रणेचा प्रभावी 'ट्रॅक'

आरोग्य विभागाच्या या शिबिरामुळे केवळ मातांची तपासणी झाली नाही, तर दुर्गम आणि ग्रामीण भागातील गरोदर महिलांना 'सुरक्षित प्रसूती'चा मोठा दिलासा मिळाला आहे. सोनोग्राफीसारख्या अत्याधुनिक तपासणीचा लाभ २०३ मातांना मिळाला असून, आशा स्वयंसेविका आणि एएनएम यांनी तळागाळातील या मातांना शिबिरापर्यंत आणण्यासाठी घेतलेले परिश्रम महत्त्वाचे ठरले.

​आरोग्य विभागाची भूमिका

'हाय-रिस्क' गरोदर मातांना ओळखून त्यांच्यावर प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतर ४५ दिवस उपचार करणे हे या अभियानाचे मुख्य यश आहे. सांगवी जिल्हा रुग्णालयाच्या या धडाकेबाज उपक्रमाने मातृमृत्यू दर कमी करण्याच्या सरकारी उद्दिष्टाला मोठी गती दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT