सांगवी: 'ह' क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने आयोजित प्रभागाच्या दुसऱ्या समन्वय बैठकीत महिनाभरानंतरही प्रभागातील एकही गंभीर समस्या मार्गी न लागल्याने नगरसेवकांचा कमालीचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. नागरिकांच्या मूलभूत समस्या आणि गैरसोयींवर जाब विचारण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवक पक्षभेद विसरून एकत्र आले आणि त्यांनी प्रशासनासमोर आक्रमक भूमिका घेतली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एसआयआर (SIR) प्रक्रियेचे कारण देत १७ तारखेपर्यंतची मुदत मागितली असून, या मुदतीत प्रलंबित कामे मार्गी न लागल्यास हा विषय थेट महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्याचा कडक इशारा या वेळी देण्यात आला.
बैठकीदरम्यान आरोग्य आणि महिला बालकल्याणअंतर्गत एक अत्यंत महत्त्वाचा ठराव घेण्यात आला. मासिक पाळीच्या दिवसांत विद्यार्थिनींची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि त्यांची सुरक्षितता लक्षात घेता, पालिकेच्या सर्व शाळांमध्ये विशेषतः नवी व जुनी सांगवीतील मनपा शाळांमध्ये स्वतंत्र 'पिंक रूम' (मुलींसाठी विशेष विश्रांती व स्वच्छता कक्ष) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळांमधील मुख्याध्यापकांच्या मागणीनुसार आणि शिक्षण मंडळाच्या सूचनेवरून पुढे आलेल्या या कक्षामध्ये सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग व इन्सिनरेटर मशिनची सोय केली जाणार आहे. जेणेकरून विद्यार्थिनींना शाळेतच योग्य ती आरोग्यविषयक काळजी घेता येईल. ''ह'' प्रभाग अध्यक्षा तृप्ती कांबळे आणि क्षेत्रीय अधिकारी पूजा दुधनाळे यांच्या उपस्थितीत या बहुप्रतिक्षित विषयाला मंजुरी देण्यात आली.
बोगस सुरक्षारक्षक, पाणीपुरवठा
प्रभागातील उद्याने आणि कार्यालयीन सुरक्षारक्षक केवळ हजेरी लावून गायब होतात आणि दोन ठिकाणी पगार लाटतात, अशा रक्षकांचे वेतन रोखून बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी. तसेच जुन्या वेळेपत्रकानुसार सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली.
कचरा व श्वानदंशाचा गंभीर प्रश्न
नव्या, जुन्या सांगवी परिसरात कचऱ्याचे ढीग साचल्याने आणि मोशी कचरा डेपोच्या त्रासामुळे परिस्थिती भीषण झाली आहे. तसेच भटक्या श्वानांचा उपद्रव रोखण्यासाठी नसबंदी व निवारागृहाची मागणी करण्यात आली असून, दापोडी येथील प्रस्तावित कचरा प्रकल्पाच्या जागेची मंजुरी प्रलंबित आहे.
अहिल्यादेवी शाळेत शिक्षकांची वानवा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मनपा शाळेत सात वर्गांसाठी केवळ सहाच शिक्षक कार्यरत असून, संगणक व क्रीडा साहित्य उपलब्ध असतानाही विषय शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे तातडीने संगणक शिक्षक व क्रीडाशिक्षक भरतीची मागणी करण्यात आली.
आरोग्य व उद्यान विभागाचा विसंवाद
झाडे छाटल्यानंतर त्याचा पालापाचोळा आठवडाभर तसाच पडून राहतो. त्यामुळे आरोग्य आणि उद्यान विभागाने समन्वय साधून झाड कटिंग करण्यासोबतच कचरा उचलणारी गाडी सोबतच ठेवावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
दशक्रिया घाट व स्मशानभूमीचे सुशोभीकरण
पावसाळ्यात पुराचे पाणी शिरल्याने सांगवीतील दशक्रिया घाट आणि स्मशानभूमी पाण्याखाली जात असून, विद्युतदाहिनी बंद पडते. घाटाची उंची वाढवावी; तसेच आजूबाजूची जागा घेऊन या स्मशानभूमीचे सुशोभीकरण करावे. शेजारील कचरा डेपोच्या दुर्गंधीचा प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली.
अतिक्रमण व गुप्त 'टीप'चा संताप
पेट्रोलपंप ते शितोळे शाळा तर दुसरीकडे सांगवी फाटा ते बँक ऑफ महाराष्ट्र आणि सांगवी परिसरातील जिल्हा रुग्णालय या रस्त्यांवर नो-पार्किंगमध्ये तसेच फुटपाथवर अनधिकृत गाड्या आणि ट्रॅव्हल्स बसेस थांबत असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे. महापालिकेची अतिक्रमण कारवाई होण्यापूर्वीच संशयितरित्या रस्ता मोकळा कसा होतो? अतिक्रमणधारकांना 'टीप' नेमकं कोण देतं? असा संतप्त सवाल करत यावर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी रस्त्यावर महापालिकेचा कर्मचारी नेमण्याची मागणी करण्यात आली.