Sangvi Hospital Water Tank Pudhari
पिंपरी चिंचवड

Sangvi Hospital Water Tank Danger: सांगवी रुग्णालयातील जीर्ण पाण्याची टाकी ठरतेय ‘मृत्यूचा सापळा’

50 वर्षे जुनी टाकी धोकादायक; नवीन टाकी उभारण्याची जोरदार मागणी

पुढारी वृत्तसेवा

राजश्री अतकरे-पवार

सांगवी: जिल्हा व उरो रुग्णालयाच्या परिसरात 50 वर्षांपूर्वी पाण्याची टाकी उभारली आहे. ती आता काळानुरुप जीर्ण होऊ लागली आहे. परंतु, तिच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने ती आता केवळ पाण्याचा साठा उरली नसून, मृत्यूचा सापळा बनली आहे. जिल्हा व उरो रुग्णालयात मोठ्या प्रमाणात नागरिक उपचारासाठी येतात. या जीर्ण टाकीमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तरी संबंधित प्रशासनाने येथील टाकी पाडून नवीन टाकी उभारावी, अशी मागणी होत आहे.

1973 मध्ये बांधलेली ही आयताकृती पाण्याची टाकी पूर्णपणे जीर्ण झाली आहे. टाकी ज्या सिमेंटच्या खांबांवर उभी आहे त्या खांब आणि स्लॅबचे तुकडे पडण्यास सुरुवात झाली आहे. हजारो रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचारी यांच्या डोक्यावर ही धोक्याची घंटा वाजत असतानाही प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे चित्र आहे. टाकीच्या खांबांचे सिमेंट निघून गेल्याने त्यातील लोखंडी सळ्या पूर्णपणे गंजल्या आहेत.

टाकीला अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून मोठ्या प्रमाणावर पाणीगळती होत आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. या पाण्याच्या टाकीचे काही वर्षांपूर्वी डागडुजी करण्यात आली होती. परंतु मोडकळीस आलेल्या डागडुजीचा उपयोग होताना दिसून येत नाही. रुग्णालय परिसरातील रहिवासी वसाहती, कर्मचारी आणि 13 कार्यालयांची तहान याच एकमेव जीर्ण टाकीवर अवलंबून आहे. तरी ही टाकी कोसळण्यापूर्वी नवीन टाकी उभारणे गरजेचे आहे. त्यामुळे या टाकीवर अवलंबून असलेल्या नागरिकांची गैरसोय थांबणार आहे.

महत्त्वाच्या नोंदी

  • इतिहास : 1973 ची निर्मिती; 50 वर्षांचा जुना वारसा आता धोकादायक.

  • परिणाम : दररोज शेकडो रुग्ण आणि नातेवाईक या टाकीच्या सावलीतून ये-जा करतात.

  • मागणी : जुनी टाकी त्वरित पाडून आधुनिक तंत्रज्ञानाची हाय-कॅपॅसिटी टाकी उभारण्यात यावी.

तीन वर्षांपूर्वी या टाकीची पाहणी केली असता तिचे आयुष्य संपल्याचे स्पष्ट झाले होते. वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची गरज वाढली आहे, मात्र ही टाकी तो भार पेलण्यास सक्षम नाही. जुने स्ट्रक्चर पाडून नवीन नियोजन करणे आवश्यक आहे.
अनिल गाडे, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
पाण्याची टाकी कालबाह्य झाली असून ती कधीही कोसळू शकते. आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वारंवार पत्रव्यवहार करून नवीन टाकी उभारण्यासाठी मागणी केली आहे. परंतु, अद्याप त्यावर ठोस कार्यवाही झालेली नाही.
अभिजित होसमणी, अधीक्षक, उरो रुग्णालय
रुग्णालय परिसरात लोकांची सतत वर्दळ असते. अशा ठिकाणी इतकी जुनी आणि खिळखिळी झालेली टाकी धोकादायक ठरू शकते. नवीन टाकी बांधणे ही आता गरज नसून तातडीची अनिवार्यता आहे.
नागनाथ एमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT