Police Pudhari
पिंपरी चिंचवड

Sangvi Dahi Handi: सांगवीतील दुर्घटनेनंतर दहीहंडीवर पोलिसांची करडी नजर; डीजेचा दणदणाट कमी, नियमभंगावर थेट कारवाई

दोन बेस-दोन टॉपची परवानगी असतानाही काही ठिकाणी अतिरिक्त साऊंड; वायर काढून डीजे बंद, मिक्सर-ॲम्प्लिफायर जप्त

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: दहीहंडीच्या उत्सवाचा जल्लोष, डीजेचा दणदणाट, लेझर-एलईडीची रोषणाई आणि रस्त्यावरची गर्दी… दरवर्षी उत्सवाचे हे चित्र पाहायला मिळते. मात्र, यंदा जुन्या सांगवीतील शिंदेनगर येथे डीजे साऊंडसाठी उभारलेली लोखंडी कमान कोसळून सलमा पठाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर उत्सवाच्या वातावरणावरच जणू सर्तकता दिसून आली. या घटनेचे पडसाद सांगवीसह पिंपरी-चिंचवड शहरात उमटले. शहरातील अनेक भागांत नेहमीचा जल्लोष कमी नव्हता; मात्र पोलिसांच्या कडक नजरेमुळे डीजेचा दणदणाट कमी जाणवत होता.

दोन बेस, दोन टॉप प्रत्यक्षात मात्र वेगळेच चित्र

दहीहंडी मंडळांना दोन बेस आणि दोन टॉप साऊंडची परवानगी देण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच ध्वनिवर्धक वापरासाठी रात्री दहा वाजेपर्यंतची मर्यादा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात काही ठिकाणी परवानगीपेक्षा अधिक साऊंड यंत्रणा उभारल्याचे चित्र दिसले. काही ठिकाणी पोलिसांनी वायर काढून साऊंड बंद केला. डीजे मिक्सर, ॲम्प्लिफायर आदी साहित्य जप्त करून विभागीय पोलिस निरीक्षकांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आल्याचे दिसून आले. ‘साहेब, सांभाळून घ्या… जरा ॲडजस्ट करा’, असा कार्यकर्त्यांचा सूरही काही ठिकाणी ऐकायला मिळाल्या. मात्र, यावेळी पोलिसांकडून नियमभंगाकडे दुर्लक्ष न करता प्रत्यक्ष हस्तक्षेप केला जात असल्याचे चित्र होते.

रस्ते बंद नागरिकांना पर्यायी मार्ग

दहीहंडीच्या मंडप, कमानी आणि साऊंड व्यवस्थेमुळे काही प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीचा बोजवारा उडाल्याचे पाहायला मिळाले. चौकांमध्ये क्रेन उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गाने जावे लागत होते. उत्सवासाठी रस्ता वापरताना पादचारी आणि वाहनांच्या हालचालीसाठी पुरेशी जागा ठेवली जाते का, हा प्रश्नही या पाहणीत प्रकर्षाने जाणवला.

लेझर-एलईडीच्या कमानी पावसामुळे विद्युत सुरक्षेचा प्रश्न

अनेक ठिकाणी लेझर आणि एलईडी लाईटच्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. शनिवारी बारीक पावसाची सर असल्याने या विद्युत सजावटीच्या सुरक्षिततेचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला. कमानीखालून ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि नागरिकांची ये-जा सुरू होती.कमान, विद्युत वायरिंग, कनेक्शन आणि पावसापासून संरक्षण यांची सुरक्षितता प्रत्यक्ष तपासली जाते का, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः आदल्या दिवशी सांगवीत कमान कोसळून महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अशा रचनांकडे अधिक काटेकोरपणे पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘डीजे मोठा आहे’ एवढेच नव्हे, तर ‘किती मोठा आहे’ याचा वस्तुनिष्ठ आकडा प्रशासनाकडे असू शकतो. त्यासाठी यंत्राचे योग्य कॅलिब्रेशन, मोजणीची पद्धत, स्थान, वेळ आणि नोंदणी यांचे प्रशिक्षण आवश्यक आहे.

उत्सव आणि सुरक्षितता यांचा समतोल हवा

दहीहंडी हा शहराच्या सांस्कृतिक उत्सवाचा भाग आहे. मात्र, उत्सवाचा जल्लोष नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारा किंवा सार्वजनिक वाहतुकीला अडथळा ठरणारा नसावा. यंदा सांगवीतील दुर्घटनेनंतर पोलिसांनी डीजे, मिक्सर, ॲम्प्लिफायर आणि परवानगीतील साऊंड सेटअपवर घेतलेली कडक भूमिका लक्षवेधी ठरली आहे. प्रश्न केवळ डीजे किती मोठा वाजतो हा नाही; तर परवानगीतील दोन बेस-दोन टॉप प्रत्यक्षात आहेत का, ध्वनी किती डेसिबल आहे, कमानी किती सुरक्षित आहेत आणि वाहतुकीसाठी जागा किती ठेवली आहे. या चारही बाबींची एकत्रित तपासणी होण्याची गरज आहे.

डेसिबल मीटरसाठी प्रशिक्षण अशक्य नाही; पद्धत महत्त्वाची

प्रदूषण नियंत्रण च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ध्वनिमापन हे ठरावीक पद्धतीने करावे लागते. Type-1/Class-1 यंत्र, योग्य मायक्रोफोन, कॅलिब्रेशन, ट्रायपॉड, योग्य उंची, स्रोतापासून योग्य अंतर आणि वेळेनुसार नोंद याला महत्त्व आहे. त्यामुळे पोलिसांकडे प्रशिक्षित पथक आणि योग्य दर्जाचे उपकरण उपलब्ध असेल तर उत्सवस्थळी ध्वनिपातळीची अधिक वस्तुनिष्ठ नोंद ठेवणे शक्य आहे. सांगवीतील दुर्घटनेने उत्सव व्यवस्थापनातील सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. शहरात पोलिसांची कडक नजर आणि मंडळांमध्ये नियम पाळण्याची धडपड दिसली. मात्र, ही कडक भूमिका केवळ एका दिवसापुरती न राहता ध्वनिमापन, विद्युत सुरक्षा, कमानींची स्थिरता आणि वाहतूक व्यवस्थापन या चारही पातळ्यांवर सातत्याने दिसली, तरच उत्सवाचा जल्लोष सुरक्षित म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT