Ration Card  Pudhari
पिंपरी चिंचवड

Ration Card Application Delay: रेशन कार्डच्या कामांसाठी नागरिकांचे हेलपाटे; सर्व्हरच्या अडचणींमुळे अर्ज रखडले

नवीन कार्ड आणि नाव समाविष्ट करण्यासाठी परिमंडळ कार्यालयात गर्दी; सुटी घेऊनही कामे होत नसल्याने नागरिक त्रस्त

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: रेशन कार्डमध्ये नवीन सदस्याचे नाव समाविष्ट करणे, तसेच नवीन रेशन कार्ड मिळविण्यासाठी नागरिकांकडून परिमंडळ कार्यालयात दररोज गर्दी होत आहे. ऑनलाइन प्रक्रियेद्वारे ही कामे केली जात असली, तरी सर्व्हरमधील तांत्रिक अडचणींमुळे काही अर्जांच्या प्रक्रियेला विलंब होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना कामासाठी वारंवार कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.

रेशन कार्डमध्ये नाव वाढविणे किंवा नवीन कार्ड काढण्यासाठी अनेक नागरिकांना कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. काही नागरिक सुटी घेऊन सलग चार ते पाच दिवस या कामासाठी येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे त्यांचा वेळ खर्च होण्याबरोबरच रोजंदारी किंवा कामाच्या उत्पन्नावरही परिणाम होत आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी विलंब होत असल्याने नागरिकांकडून कामकाजाबाबत विचारणा केली जात आहे.

कामकाजावर परिणाम

दरम्यान, कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ऑनलाइन सर्व्हरमधील तांत्रिक अडचणींमुळे काही कामांना अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे स्पष्ट केले आहे. ऑनलाइन प्रणालीवर अवलंबून असलेल्या प्रक्रियेत तांत्रिक अडथळे निर्माण झाल्यास कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम राखावा, तसेच आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात यावे, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे.

आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी

तांत्रिक अडचणी दूर करून नागरिकांना सहकार्य मिळावे, तसेच ऑनलाइन प्रक्रियेबाबत योग्य माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, यासाठी पुरवठा विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

प्रलंबित अर्जांचा वेळेत निपटारा करा

शासकीय सेवांचे डिजिटल माध्यमातून सुलभीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असताना तांत्रिक अडचणींचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था आणि प्रभावी मार्गदर्शन उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. अर्जाची सद्यस्थिती नागरिकांना सहज समजावी, वारंवार कार्यालयात येण्याची गरज भासू नये आणि प्रलंबित अर्जांचा निपटारा वेळेत व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ऑनलाइन सर्व्हरमधील तांत्रिक अडचणींमुळे काही कामकाजास विलंब होत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच, नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करताना काही अडचणी येत असल्यास त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयाशी संपर्क साधावा.
प्रदीप डंगारे, परिमंडल अधिकारी, ज विभाग
रेशन कार्डच्या कामासाठी वारंवार हेलमाटे मारावे लागत आहेत. कामावरून सुटी घेऊनही काम पूर्ण होत नसल्याने वेळ आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना योग्य मार्गदर्शन करून कामे लवकर पूर्ण करावीत.
जयश्री भालके, नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT