

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मालकीच्या शहरातील वेगवेगळ्या भागांतील एकूण ६३ मोठ्या जागांवर अतिक्रमण झाले आहे. तेथे पत्राशेड व इतर माध्यमातून व्यवसाय केला जात आहे. ती अतिक्रमणे पूर्णपणे हटवण्यासाठी तीव्र कारवाई करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी सर्व दहा क्षेत्रीय अधिकारी, नगर रचना विभागाचे अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
शहरातील अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. १८) बैठक झाली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना वरील सूचना दिल्या.
या वेळी बांधकाम परवानगी विभागाचे सहशहर अभियंता सुनील बागवानी, सर्व क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता व बीट निरीक्षक उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त सांडभोर म्हणाल्या, की दिवाळीच्या सुटीच्या कालावधीत शहरात अनधिकृत बांधकामे झाल्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची क्षेत्रीय अधिकारी आणि बीट निरीक्षकांनी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती कारवाई करावी.
क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याची नियमित कारवाई सुरू ठेवावी रस्त्यांवर झालेली अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणी सुरू असलेली प्राथमिक स्वरूपातील कामे, विशेषतः फुटिंगची कामे, यांची तातडीने पाहणी करून संबंधित ठिकाणांची यादी तयार करावी. नियमानुसार कारवाई करावी.
पार्किंगच्या जागेत व्यावसायिक वापर
शहरातील काही इमारतींच्या पार्किंगसाठी राखीव असलेल्या जागेचा व्यावसायिक कारणांसाठी अनधिकृत वापर होत आहे. त्यामुळे वाहने पदपथ तसेच, रस्त्यावर उभी केली जातात. त्याबाबत बैठकीत कारवाईचा आढावा घेण्यात आला. बांधकाम परवानगी विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून या प्रकरणांमध्ये कारवाई या आठवड्यात पूर्ण करावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिले आहेत.