Moshi Waste To Energy Project: मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प साडेपाच महिन्यांपासून बंद; १.१५ लाख टन कचरा साचला

चिमणी उभारणीचे काम रखडले; महापालिकेचे साडेसहा कोटींचे नुकसान, ठेकेदाराला २४ लाखांचा दंड
Waste To Energy Project
Waste To Energy ProjectPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील सुक्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्पातील धुराड्याची चिमणी पडल्यामुळे साडेपाच महिन्यांपासून बंद असलेला प्रकल्प सुरू करण्यात ठेकेदार व पर्यावरण विभागाला अद्याप यश आले नाही. चिमणी उभारण्यास विलंब होत असल्याने डेपोत कचऱ्याचे डोंगर वाढत आहेत. प्रकल्प बंद असल्याने तब्बल एक लाख १५ हजार ५०० टन सुक्या कचऱ्यावर प्रक्रियाच झालेली नाही. मुदतीमध्ये काम पूर्ण न करणाऱ्या ठेकेदाराला एक ऑक्टोबरपासून प्रतिदिन ५० हजार रुपयांचा दंड लावला जात आहे.

Waste To Energy Project
Bhama Askhed Water Supply Project: पिंपरी-चिंचवडकरांना मार्चमध्ये मिळणार १६७ एमएलडी अतिरिक्त पाणी; भामा-आसखेड योजना अंतिम टप्प्यात

मोशी येथील ८१ एकर जागेतील डेपोत संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा मागील ४० वर्षांपासून कचरा टाकला जात आहे. शहरात दररोज सुमारे एक हजार ५०० टन कचरा डेपोत आणून टाकला जात आहे. येथे ७०० टन कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प अॅन्टोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि. या ठेकेदारामार्फत जुलै २०२३ पासून सुरू आहे. त्या माध्यमातून दररोज ७०० टन सुक्या कचऱ्यांची विल्हेवाट लागत आहे. तसेच, बायोमायनिंगसाठी कोट्यवधी रुयपांचा खर्च करूनही अद्याप तेथील कचऱ्याचे डोंगर कमी झालेले नाहीत.

Waste To Energy Project
Fodder Cultivation For Drought Relief: दुष्काळग्रस्त पशुधनासाठी महापालिकेचा पुढाकार; ४०० एकरांवर चारा लागवड करणार

दररोज सातशे टन सुका कचरा जाळून त्यापासून १४ मेगा वॅट वीज तयार केली जात आहे. पाच जून २०२६ रोजी प्रकल्पातील धुराड्याची चिमणी पडल्याने वेस्ट टू एनर्जी प्रकल्प बंद झाला आहे. त्यानंतर ८ जुलैला प्रकल्पातील अनधिकृत प्रशासकीय इमारत कोसळून ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर १२ कर्मचारी जखमी झाले होते. तेव्हापासून शहरात कच-याची समस्या अधिक गंभीर झाली आहे. डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित ठेकेदाराला दिले होते.

Waste To Energy Project
Dehu Indrayani River Ghat: देहूत इंद्रायणी घाटाची पडझड; भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!

ठेकेदाराने ३० सप्टेंबरपर्यंत चिमणीचे काम पूर्ण करून एक ऑक्टोबरपासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही दिली दिली होती. मात्र, ठेकेदार ३० सप्टेंबरपर्यंत चिमणीचे कामकाज पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे आयुक्तांनी ठेकेदाराला एक ऑक्टोबरपासून प्रतिदिन ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा प्रकल्प १५ नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्याचे आदेशही प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला दिले होते, परंतु या मुदतीमध्येही चिमणी उभारण्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. सोळा नोव्हेंबरपर्यंत ६० मीटर उंचीपैकी ५४ मीटर चिमणी उभारण्याचे काम पूर्ण झाल्याचे पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दररोज सातशे टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने डेपोत कचऱ्याचे नवीन डोंगर तयार झाले आहेत. कचऱ्याचे डोंगर कमी होण्याऐवजी वाढत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

प्रकल्प बंद असल्याने एक लाख १५ हजार ५०० टन कचरा वाढला

वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू असताना दररोज ७०० टन कचरा जाळला जात होता. त्यातून १४ मेगा वॅट वीजनिर्मिती केली जात होती. मात्र, गेल्या साडेपाच महिन्यांपासून प्रकल्प बंद असल्याने तब्बल एक लाख १५ हजार ५०० टन सुका कचऱ्यावर प्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे क्षमता संपली असताना मोशी कचरा डेपोत कचऱ्याचे सात ते आठ मजली इमारती एवढे नवीन डोंगर तयार झाले आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

Waste To Energy Project
Pimpri Court Employees Strike: पिंपरी न्यायालयातील ६७ कर्मचारी बेमुदत संपावर; न्यायालयीन कामकाज ठप्प

दिवाळीतील सुटीमुळे कामास विलंब

वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील चिमणी सुरू करण्यासाठी संबंधित ठेकेदाराला १५ नोव्हेंबरपर्यंतची दुसरी मुदत दिली होती. मात्र, दिवाळीच्या सुट्यांमुळे कामाला विलंब झाला. चिमणीचे ६० मीटरपैकी ५४ मीटर काम पूर्ण झाले आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करून चाचणी घेऊन प्रकल्प सुरू केला जाईल, असे महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सहशहर अभियंता विनय ओहोळ यांनी सांगितले.

महापालिकेचे साडेसहा कोटींहून अधिकचे नुकसान

साडेपाच महिन्यांपासून वेस्ट टू एनर्जी प्रकल्प बंद असल्याने वीज निर्मिती ठप्प आहे. प्रकल्पात निर्माण होणारी वीज महापालिकेकडून महावितरणला देण्यात येत होती. त्यातून सवलतीमध्ये मिळणाऱ्या विजेचा रावेत येथील अशुद्ध पाणी उपसा केंद्र आणि मैलाशुध्दीकरण केंद्राला वापर केला जात होता. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पच बंद असल्याने महापालिकेचे साडेपाच महिन्यांत सुमारे साडेसहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. महापालिकेला अधिकच्या दराने वीजबिल भरावे लागत आहे, अशी माहिती विद्युत विभागाने दिली आहे. तसेच, दररोज ७०० टन कचरा न जाळल्याने कचऱ्याचा भार वाढला आहे. वेस्ट टू एनर्जीच्या ठेकेदाराला १ ऑक्टोबरपासून १७ नोव्हेंबरपर्यंत दिवसाला ५० हजार रुपयांनुसार ४८ दिवसांत दंडाची रक्कम २४ लाख रूपये झाली आहे. प्रकल्प बंद असल्याने महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.