Ration Card Correction Issue Pudhari
पिंपरी चिंचवड

Ration Card Aadhaar Linking: रेशनकार्डच्या कामासाठी निगडीत नागरिकांचे हेलपाटे; आधारमधील त्रुटींमुळे प्रक्रिया रखडली

आधार आणि रेशनिंग कार्यालयातील कामांची माहिती नसल्याने नागरिकांची धावपळ; योग्य मार्गदर्शनाची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

पिंपरी: रेशनकार्डला आधार क्रमांक जोडणे तसेच रेशनकार्डमधील विविध दुरुस्तीच्या कामांत आधारकार्ड अद्ययावत नसल्याने नागरिकांना या कामात समस्या निर्माण होत आहेत. आधारवरील नाव, जन्मतारीख किंवा अन्य तपशीलांत त्रुटी असल्यास रेशनकार्डशी आधार लिंक होत नाही. परिणामी, रेशनकार्डमधील दुरुस्तीची प्रक्रियाही रखडते. आधारमधील माहिती दुरुस्त करण्याचे काम रेशनिंग कार्यालयात होत नसून त्यासाठी आधार सेवा केंद्रात जावे लागते. मात्र, या दोन्ही प्रक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी होत असल्याची माहिती नसल्याने नागरिकांना कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असून, त्यामुळे सामान्यांवर त्रागा करून घेण्याची वेळ येत आहे.

‘आधार’वरील माहिती अचूक असणे गरजेचे

सध्या रेशनकार्डसंदर्भात आधार लिंकिंग, कुटुंबातील सदस्यांचे नाव कमी करणे, नवीन शिधापत्रिका काढणे, नावातील बदल, पत्ता दुरुस्ती अशा विविध कामांसाठी नागरिक रेशनिंग कार्यालयात येत आहेत. यापैकी अनेक कामांसाठी आधारकार्डवरील माहिती अचूक असणे आवश्यक आहे. आधारकार्डवरील नाव आणि रेशनकार्डमधील नाव यामध्ये तफावत असल्यास किंवा जन्मतारीख, अन्य तपशील जुळत नसल्यास आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण होत नाही. त्यामुळे नागरिकांना आधी आधारमधील त्रुटी दूर करण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया करावी लागत आहे.

आधार दुरुस्तीसाठी सेवा केंद्रात जाणे आवश्यक

आधारकार्डमधील नाव, जन्मतारीख, पत्ता किंवा अन्य माहितीमध्ये बदल करण्याची सुविधा आधार सेवा केंद्रांमार्फत उपलब्ध आहे. रेशनिंग कार्यालयात आधारकार्डमधील माहिती बदलण्याचे काम केले जात नाही. त्यामुळे आधारमधील माहिती चुकीची असल्यास नागरिकांनी प्रथम आधार सेवा केंद्रात जाऊन आवश्यक कागदपत्रांच्या आधारे दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे. त्यानंतर अद्ययावत आधार तपशिलांच्या आधारे रेशनकार्डशी लिंकिंग किंवा अन्य दुरुस्तीची प्रक्रिया करता येते. मात्र, ही माहिती नसल्याने काही नागरिक आधी रेशनिंग कार्यालयात जातात. तेथे आधारमधील त्रुटी असल्याचे समजल्यानंतर त्यांना पुन्हा आधार सेवा केंद्रात जावे लागते.

नाव कमी करणे, नवीन शिधापत्रिकेच्या कामांनाही अडथळे

कुटुंबातील सदस्याचा मृत्यू, विवाह किंवा अन्य कारणांमुळे रेशनकार्डमधून नाव कमी करण्यासाठी अर्ज केले जातात. तसेच स्वतंत्र कुटुंब झाल्यानंतर नवीन शिधापत्रिका मिळविण्यासाठीही नागरिकांकडून अर्ज करण्यात येतात. या कामांसाठी संबंधित कागदपत्रांची पूर्तता आणि माहितीची पडताळणी करावी लागते. आधारकार्डवरील तपशील अद्ययावत नसल्यास किंवा रेशनकार्डमधील नोंदींशी जुळत नसल्यास प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अर्जदारांना आवश्यक दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते.

कार्यालयांकडून स्पष्ट मार्गदर्शनाची अपेक्षा

रेशनकार्डसंदर्भातील कामांसाठी नागरिकांना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, आधारमधील दुरुस्ती कुठे करायची आणि रेशनकार्डमधील बदलासाठी कोणत्या कार्यालयाशी संपर्क साधायचा, याबाबत स्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आहे. आधार सेवा केंद्र आणि रेशनिंग कार्यालय यांच्यातील कामांची विभागणी नागरिकांना समजल्यास अनावश्यक हेलपाटे टाळता येऊ शकतात. त्याचबरोबर रेशनिंग कार्यालयात अर्जाची स्थिती, त्रुटी आणि पुढील प्रक्रियेबाबत योग्य मार्गदर्शन मिळाल्यास नागरिकांचा वेळ वाचण्यास मदत होईल. आधारमधील माहिती अद्ययावत ठेवून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केल्यास रेशनकार्डसंदर्भातील कामे अधिक सुलभ होऊ शकतात.

शासन नियमाप्रमाणे सर्व नागरिकांनी आधार कार्ड तसेच इतर कागदपत्रे प्रमाणित करून घ्यावीत ज्यामुळे नागरिकांची धावपळ वाचेल आणि रेशन कार्ड संबंधातील कामे लवकर पूर्ण होऊ शकतील.
प्रदीप डंगारे (अन्नधान्य वितरण परिमंडळ अधिकारी ‘ज’ विभाग, पिंपरी)
शासकीय योजना या जनतेसाठीच आहे. याचा फायदा जनतेलाच होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली कागदपत्रे योग्यवेळी प्रमाणित करून घ्यावीत. इतर समस्यांसाठी नागरिकांनी कार्यालयात येऊन समस्या सांगावी तिची योग्य ती दखल घेतली जाईल.
विजयकुमार क्षीरसागर (अन्नधान्य वितरण परिमंडळ अधिकारी ‘अ’ विभाग, चिंचवड)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT