पिंपळे निलख: पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रक्षक चौक ते हिंजवडी मार्गावर वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. वाहतूक कोंडी ही बहुतांश वेळा रस्त्यात लावलेल्या हातगाड्यांमुळे होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात काही हातगाडीवाले खराब साहित्य, फळे एखाद्या कॅरेटमध्ये न ठेवता ज्या ठिकाणी गाडा लावलेला आहे तेथेच फेकून जात आहेत. यामुळे परिसराचे विद्रुपीकरण होत असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे परिसराचे विद्रुपीकरण व वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणार्या हातगाडींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
रक्षक चौक परिसरात व शिवाजीनगरड्ढहिंजवडी रोडवर हातगाड्यांचे प्रमाण वाढले आहे. आधीच वाहतूक कोंडीने हैराण असलेल्या नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. रस्त्याच्या कडेला फळविक्रेते गाड्या उभा करत असल्याने वाहनचालक गाड्या रस्त्यात पार्क करून साहित्य, फळांची खरेदीसाठी थांबतात. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी अपघातसदृश परिस्थिती उद्भवण्याचा धोका वाढला आहे.
फळविक्रेते विक्री संपल्यानंतर पालापाचोळा, हिरवा पाला आणि सडलेली फळे तिथेच टाकून जात असल्याने दुर्गंधी पसरते, रस्ता अस्वच्छ दिसतो आणि पादचाऱ्यांना मार्गक्रमण करताना त्रास सहन करावा लागतो. पादचारी मार्ग अडवल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना जीव मुठीत धरून चालावे लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. नागरिकांनी या मार्गावरील अतिक्रमणे तातडीने हटविणे, विक्रेत्यांसाठी ठराविक जागा निश्चित करणे आणि स्वच्छतेची सक्त अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
रोज याच रस्त्यावरून जाणे म्हणजे जीव धोक्यात घालणे. हातगाड्या रस्त्यावर, गाड्या थांबलेल्या, कचरा पसरलेला प्रशासनाला हे दिसत नाही का? एखादा मोठा अपघात घडल्यावरच कारवाई होणार का?तुकाबा गोपाळे, ज्येष्ठ नागरिक
आम्ही या आधी येथे कारवाई केली आहे. परत जर हे घडत असेल तर तात्काळ कारवाई करण्यात येईल. यापुढे दररोज पथक पाठवून रस्त्यात हातगाड्या उभा राहणार नाहीत याची काळजी घेण्यात येईल. तसेच हातगाडीवाल्यांनी देखील वाहतुकीस अडथळा निर्माण होणारी याची काळजी घ्यावी.आकाश इंगवले, ड क्षेत्रीय